इलेक्ट्रिक कारचा वापर वाढत असताना हुंडई कंपनी तिची नवीन कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक एसयूव्ही सादर करण्याच्या तयारीत आहे. या कारची रेंज, डिझाइन आणि तंत्रज्ञान ग्राहकांच्या पसंतीचे ठरणार असल्याची चर्चा आहे. कंपनीने या कारच्या ‘आयोनिक P’ या नावाच्या ट्रेडमार्कसाठी भारतात अर्जही केला आहे. मात्र, या ट्रेडमार्कला कंपनीने किंवा सरकारी ट्रेडमार्क संकेतस्थळाने अधिकृत दुजोरा दिलेला नाही, आणि अर्जाचा आढावा सध्या सुरू आहे.
नावावर अजून शिक्कामोर्तब नाही
या इलेक्ट्रिक एसयूव्हीला याआधी HE1i या कोडनेमने ओळखले जात होते. ही भारतात कंपनीची पहिलीच कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक कार असणार आहे, जी आयोनिक ब्रँडअंतर्गत ग्राहकांना सादर केली जाणार आहे. तिचा लूक-डिझाइन जागतिक पातळीवरील इंस्टर मॉडेलशी मिळताजुळता असणार आहे. हुंडईच्या व्यवस्थापनाने आर्थिक वर्ष २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीच्या विश्लेषकांशी झालेल्या चर्चेदरम्यान या मॉडेलला आयोनिक P हे नाव दिले होते. मात्र, हे नाव अजून निश्चित झालेले नाही आणि कंपनी दुसरे नावही देऊ शकते. सध्या अनेक बातम्यांमध्ये या एसयूव्हीचा उल्लेख आयोनिक P असाच केला जात आहे.
कधी सादर होणार?
गेल्या ऑटो एक्स्पोदरम्यान हुंडईने तिच्या क्रेटा इलेक्ट्रिक कारला अधिकृतपणे विक्रीसाठी सादर केले होते. त्याच धर्तीवर, नवीन एसयूव्ही १६ जानेवारी २०२७ रोजी सादर केली जाईल, अशी अपेक्षा आहे. तिच्या किंमतीची घोषणा ४ ते ९ फेब्रुवारी २०२७ दरम्यान आयोजित भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये केली जाऊ शकते. ही हुंडईची भारतीय बाजारपेठेत सादर होणारी पहिली बजेट इलेक्ट्रिक एसयूव्ही असेल आणि ती कंपनीच्या ई-जीएमपी (के) इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर तयार केली जाण्याची शक्यता आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा