२६ नोव्हेंबर हा दिवस मुंबईसाठी कधीही विसरता न येणारा दिवस आहे. २००८ मध्ये याच दिवशी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्या घटनेला आज १८ वर्षे पूर्ण झाली. याच दिवशी महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना बॉम्बस्फोटाने उडवून देण्याच्या धमक्या मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या महापौर कार्यालयाला आज पुन्हा एकदा धमकीचा ई-मेल आला. या मेलमध्ये महापालिका कार्यालय उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच मुंबईतील महालक्ष्मी, सायन आणि आचार्य मेट्रो स्थानकांवर आयईडी बॉम्ब ठेवल्याचा दावा करण्यात आला आहे. २७ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत मेट्रो स्थानकांवर स्फोट घडवण्याची धमकीही या मेलमध्ये देण्यात आली आहे.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या हल्ल्याच्या आठवणी आजही अनेकांच्या मनात ताज्या आहेत. त्या घटनेला १८ वर्षे पूर्ण होत असताना याच दिवशी राज्यभरातील महत्त्वाच्या ठिकाणांना धमक्या मिळाल्याने या घटनेकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे. मुंबईसह पुणे, नाशिक आणि नागपूर या शहरांतील न्यायालये आणि सरकारी कार्यालयांना धमकीचे मेल मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
महापालिका कार्यालय आणि मेट्रो स्थानकांना धमकी
गेल्या काही महिन्यांत मुंबईतील महापौर कार्यालयाला अनेकदा अशा प्रकारचे धमकीचे मेल आले आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री कार्यालय, बीएसई इमारत, मुंबई विमानतळ आणि अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्यालाही अशा धमक्या देण्यात आल्या होत्या. त्यामुळे या धमक्यांकडे सुरक्षा यंत्रणा गांभीर्याने पाहत आहेत.
मुंबईप्रमाणे नवी मुंबई महापालिका, बेलापूर न्यायालय, सिडको आणि कोकण भवन या ठिकाणांनाही धमकीचे मेल मिळाले. खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित इमारती रिकाम्या करण्यात आल्या. पोलीस, अग्निशमन दल आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण परिसराची तपासणी करण्यात आली.
पुणे, नाशिक आणि नागपूर न्यायालयांतही तपासणी
पुणे जिल्हा व सत्र न्यायालयालाही नोव्हेंबर महिन्यात तीन वेळा बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली आहे. २, २३ आणि २६ नोव्हेंबर रोजी आलेल्या मेलमुळे न्यायालयातील कामकाज थांबवून परिसर रिकामा करण्यात आला. बॉम्बशोधक पथकाने तपासणी केली, मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.
पुण्यापाठोपाठ नाशिक आणि नागपूर जिल्हा न्यायालयालाही धमकीचा ई-मेल मिळाला. नाशिकच्या ई-मेलमध्ये न्यायालयाचा सहावा मजला उडवून देण्याचा उल्लेख होता, तर नागपूर न्यायालयाला आलेल्या धमकीमध्ये आक्षेपार्ह मजकूर असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी दोन्ही ठिकाणी संपूर्ण परिसराची तपासणी केली. मात्र, कोणतेही स्फोटक आढळले नाही.
एकाच दिवशी राज्यातील अनेक शहरांना धमक्या मिळाल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. हे मेल नेमके कोणी पाठवले आणि त्यामागे कोणाचा हात आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
प्रतिक्रिया व्यक्त करा