खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार गट) नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर उपहासात्मक टिप्पणी केली आहे. सुळे एनडीएमध्ये जाऊन मुख्यमंत्री होत असतील, तर त्यांचे स्वागतच असल्याचे राऊत म्हणाले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये केवळ दहा आमदार असून त्यांचे तीन गट पडले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
दहा आमदारांच्या पक्षाला मुख्यमंत्रीपद म्हणजे दिलदारी
राऊत म्हणाले, भाजप फक्त दहा आमदार असलेल्या पक्षाला मुख्यमंत्रीपद देणार असेल, तर ती त्यांची दिलदारीच म्हणावी लागेल. हा एक विक्रमच ठरेल, कारण महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळेल, असेही ते म्हणाले.
सुळे यांनी गेल्या बारा वर्षांपासून मंत्री असल्याचे वक्तव्य केल्यावर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. गेले बारा वर्ष माझा शपथविधी होतोय, माझ्यावर अन्याय करू नका. २०१४ पासून मी मंत्री होते, असे सुळे म्हणत असल्याचे ऐकले आहे, असे राऊत म्हणाले.
शपथविधीला हजर राहीन
यावर राऊत म्हणाले, हे आम्हालाही फार हृदयाला लागले आहे. जर त्यांना खरोखर मुख्यमंत्री केले जाणार असेल, तर मी त्यांच्या शपथविधी सोहळ्याला हजर राहीन आणि पक्षाची भूमिका मांडीन, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य लक्षवेधी ठरले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा