भारतीय रिझर्व्ह बँकेने सोन्याच्या साठ्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या सहा महिन्यांत केंद्रीय बँकेने ६०.०८ टन सोने परदेशातून भारतात परत आणले आहे. त्यामुळे देशात ठेवलेला सोन्याचा साठा आता ७४०.१३ टन झाला आहे. मार्च महिन्यात हा साठा ६८०.०५ टन इतका होता.
एकूण साठा ८८० टनांपेक्षा जास्त
परदेशी चलन व्यवस्थापनाबाबतच्या सहा महिन्यांच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार सप्टेंबर २०२६ पर्यंत केंद्रीय बँकेकडे एकूण ८८०.५२ टन सोने होते. यापैकी सुमारे ८४.०६ टक्के सोने भारतात आहे. मार्च २०२६ मध्ये हा वाटा ७७.२३ टक्के इतका होता. सप्टेंबर २०२६ पर्यंत १४०.३९ टन सोने बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट्सकडे सुरक्षित ठेवण्यात आले होते. जागतिक अनिश्चितता आणि वाढता भूराजकीय तणाव यांच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक सातत्याने सोने देशात परत आणत आहे. यापूर्वी आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या दुसऱ्या सहामाहीत १०४ टन सोने भारतात परत आणण्यात आले होते.
सोन्याच्या किंमतीत चढउतार
सोन्याची आवक वाढली असली तरी परकीय गंगाजळीत सोन्याचा वाटा कमी झाला आहे. अमेरिकन डॉलरच्या मूल्याच्या आधारावर सप्टेंबर २०२६ च्या अखेरीस परदेशी चलन साठ्यात सोन्याचा वाटा १४.३८ टक्के इतकाच उरला. मार्च २०२६ मध्ये हा वाटा १६.७० टक्के इतका होता. एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत चढउतार दिसून आला. सप्टेंबर महिन्यात सोन्याचा सरासरी भाव सुमारे ९ टक्क्यांनी घसरून ४,३१९ डॉलर प्रति ट्रॉय औंस इतका होता. एप्रिल महिन्यात हा भाव सुमारे ४,७२१ डॉलर प्रति ट्रॉय औंस राहिला होता. अमेरिकन ट्रेझरी बाँड्सवरील अधिकचे उत्पन्न, डॉलरची मजबूत स्थिती आणि व्याजदरात वाढ यांमुळे सोन्याच्या किंमतीवर दबाव असल्याचे सांगितले जात आहे. सुरक्षित गुंतवणूक आणि पोर्टफोलिओतील विविधता यासाठी सोन्याची मागणी मात्र कायम आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा