मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेने १५ डब्यांची लोकल वांद्रे स्थानकापर्यंत चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ही सेवा केवळ अंधेरीपर्यंत मर्यादित आहे. त्यामुळे प्रवाशांकडून या फेऱ्यांचा विस्तार करण्याची मागणी सातत्याने होत होती. आता या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
१५ डब्यांची लोकल उभी राहण्यासाठी किमान ३३० मीटर लांबीचा फलाट आवश्यक असतो. त्यासाठी पश्चिम रेल्वेने वांद्रे, खार रोड, सांताक्रूझ आणि विलेपार्ले या चार स्थानकांवरील फलाट लांब करण्याचे काम हाती घेतले आहे. खार रोड स्थानकातील काम पूर्ण झाले असून वांद्रे स्थानकातील काम ७५ टक्के पूर्ण झाले आहे. सांताक्रूझ आणि विलेपार्ले स्थानकांवरील कामे प्रत्येकी ४० टक्के पूर्ण झाली आहेत. फलाट वाढवलेल्या ठिकाणी छताची कामे सध्या सुरू आहेत.
प्रत्येक फेरीत ६०० अतिरिक्त प्रवासी
या विस्तारानंतर प्रत्येक फेरीमागे अतिरिक्त ६०० प्रवासी वाहून नेण्याची क्षमता निर्माण होणार आहे. फलाटांची अनुपलब्धता असल्याने आतापर्यंत प्रवाशांना १२ डब्यांच्या लोकल फेऱ्यांवरच अवलंबून राहावे लागत होते. आता १५ डब्यांच्या फेऱ्या वांद्रेपर्यंत धावू लागल्यावर गर्दीच्या वेळी प्रवाशांना अधिक जागा मिळेल.
दादर आणि मुंबई सेंट्रलपर्यंत विस्ताराचे नियोजन
अंधेरी ते वांद्रे विभागातील फलाटांची कामे पूर्ण झाल्यानंतर १५ डब्यांच्या लोकलचा विस्तार पुढे दादर आणि त्यानंतर मुंबई सेंट्रलपर्यंत करण्याचे पश्चिम रेल्वेचे नियोजन आहे. ही कामे टप्प्याटप्प्याने केली जाणार असून मार्च २०२७ पर्यंत ती पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलचा प्रवास २००९ मध्ये दादर-विरार मार्गावर सुरू झाला होता. त्यानंतर २०११ मध्ये चर्चगेट येथून पहिली १५ डब्यांची लोकल चालवण्यात आली. २८ जून २०२१ रोजी धीम्या मार्गावरही या सेवा सुरू झाल्या होत्या, मात्र त्यांचा विस्तार अंधेरीपर्यंतच मर्यादित राहिला होता.
प्रतिक्रिया व्यक्त करा