स्तनाचा कर्करोग म्हटलं की अनेक महिलांच्या मनात सर्वप्रथम स्तनामध्ये गाठ असल्याचे चित्र उभं राहतं. मात्र स्तनामध्ये गाठ जाणवणे हेच स्तनाच्या कर्करोगाचे एकमेव लक्षण नाही. काही वेळा स्तनाच्या आकारात किंवा त्वचेत होणारे बदल, स्तनाग्रांमधील बदल किंवा असामान्य स्त्राव हीदेखील सुरुवातीची लक्षणे असू शकतात. त्यामुळे गाठ नाही म्हणजे कर्करोगाचा धोका नाही, असा निष्कर्ष काढणे योग्य नाही. शरीरातील बदल वेळीच ओळखणे आणि आवश्यकतेनुसार वैद्यकीय तपासणी करून घेणे हे स्तनाच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. नाशिकमधील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सल्लागार ऑन्कोलॉजिस्ट डॉ. रोशन कुमार पाटील यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
गाठ नसतानाही कोणती लक्षणे दिसू शकतात?
डॉ. रोशन पाटील सांगतात की, स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे प्रत्येक महिलेमध्ये सारखीच असतील असे नाही. काही महत्त्वाच्या संकेतांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. एका स्तनाचा आकार अचानक बदलणे, सूज येणे किंवा दोन्ही स्तनांमध्ये पूर्वीपेक्षा वेगळेपणा जाणवणे हे तपासणीचे कारण ठरू शकते. स्तनाच्या त्वचेवर खळगे पडल्यासारखे दिसणे, त्वचा जाड होणे, लालसरपणा येणे किंवा संत्र्याच्या सालीसारखा पोत दिसणे याकडे दुर्लक्ष करू नये. स्तनाग्र आत ओढले जाणे, त्याच्या आकारात बदल होणे, त्याभोवती पुरळ किंवा न बरी होणारी जखम दिसणे ही संभाव्य धोक्याची लक्षणे असू शकतात. गर्भधारणा किंवा स्तनपानाशी संबंधित नसताना, विशेषतः एका स्तनाग्रातून रक्तमिश्रित किंवा आपोआप स्त्राव होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्तनामध्ये किंवा काखेत सतत वेदना, सूज किंवा जडपणा जाणवणे यामागे अनेक कारणे असू शकतात. ही लक्षणे नेहमीच कर्करोग दर्शवत नाहीत; मात्र ती कायम राहिल्यास तपासणी आवश्यक आहे.
निदान आणि उपचार कसे होतात?
डॉ. रोशन पाटील सांगतात की, स्तनामध्ये जाणवणारा प्रत्येक बदल कर्करोगामुळेच होतो असे नाही. हार्मोन्समधील बदल, संसर्ग, सिस्ट किंवा इतर सौम्य आजारांमुळेही अशी लक्षणे दिसू शकतात. मात्र कारण निश्चित करण्यासाठी वैद्यकीय तपासणी आवश्यक असते. डॉक्टर रुग्णाचा वैद्यकीय इतिहास जाणून घेऊन स्तनांची तपासणी करतात. गरजेनुसार सोनोग्राफी, मॅमोग्राफी किंवा इतर इमेजिंग तपासण्या सुचवल्या जाऊ शकतात. संशयास्पद बदल आढळल्यास बायोप्सी करून ऊतींची तपासणी केली जाते. स्तनाच्या कर्करोगाचे निश्चित निदान बायोप्सीद्वारे केले जाते. निदान झाल्यास उपचारांचा निर्णय कर्करोगाच्या टप्प्यावर आणि रुग्णाच्या स्थितीवर अवलंबून घेतला जातो. उपचारांमध्ये स्तनाची शस्त्रक्रिया, आवश्यकतेनुसार स्तन जतन करणारी शस्त्रक्रिया किंवा मास्टेक्टॉमी, रेडिएशन थेरपी, केमोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि टार्गेटेड थेरपी यांचा समावेश असू शकतो. काही रुग्णांसाठी इम्युनोथेरपीदेखील उपयुक्त ठरू शकते. प्रत्येक रुग्णाला सर्व उपचारांची गरज असतेच असे नाही. योग्य उपचारपद्धती तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ठरवली जाते. स्तनांमध्ये होणारे नेहमीचे बदल ओळखणे, नियमित आरोग्य तपासणी करणे आणि वय व वैयक्तिक जोखमीनुसार मॅमोग्राफीसारख्या तपासण्यांबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. स्तनातील नवीन किंवा असामान्य बदल जाणवल्यास तो आपोआप बरा होण्याची वाट न पाहता वैद्यकीय सल्ला घ्यावा. स्तनाच्या कर्करोगाचे निदान लवकर झाल्यास उपचार अधिक प्रभावी ठरण्याची शक्यता वाढते. गाठ नसली तरी इतर लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर तपासणी करणे हे स्वतःच्या आरोग्याच्या रक्षणासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा