बदलते हवामान, वाढते वायुप्रदूषण आणि वातावरणातील धूळ यांचा परिणाम लहान मुलांच्या श्वसन आरोग्यावर होत आहे. अनेकदा मुलांना सतत खोकला येत असल्यास पालक त्याकडे हंगामी बदल किंवा साधी सर्दी म्हणून पाहतात. मात्र खोकला अनेक दिवस कायम राहणे किंवा वारंवार उद्भवणे ही दुर्लक्ष करण्यासारखी बाब नाही. वायुप्रदूषणासोबतच श्वसनमार्गाचे संसर्ग, अॅलर्जी आणि दमा यांसारख्या आजारांमुळेही मुलांना दीर्घकाळ खोकल्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे खोकल्यामागील नेमके कारण वेळीच शोधून योग्य उपचार घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
खोकल्यामागची कारणे कोणती?
लहान मुलांची फुफ्फुसे अद्याप पूर्णपणे विकसित झालेली नसतात. तसेच प्रौढांच्या तुलनेत त्यांचा श्वास घेण्याचा वेग अधिक असतो. त्यामुळे वाहनांचा धूर, बांधकामांमधील धूळ आणि हवेत असलेले सूक्ष्म प्रदूषित कण त्यांच्या श्वसनमार्गावर परिणाम करू शकतात. यामुळे श्वसनमार्गाला सूज आणि जळजळ होऊन खोकला, छातीत घरघर तसेच श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. विशेषतः दमा किंवा अॅलर्जीचा त्रास असलेल्या मुलांमध्ये ही लक्षणे अधिक तीव्र होण्याची शक्यता असते. मदरहूड हॉस्पिटल, खराडी, पुणे येथील वरिष्ठ नवजात शिशू आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. तुषार पारिख यांच्या मते, मुलांना सतत खोकला येत असेल, त्याचे प्रमाण वाढत असेल किंवा वारंवार खोकला होत असेल, तर पालकांनी त्याकडे दुर्लक्ष करू नये. खोकल्यासोबत ताप, वेगाने श्वास घेणे, छातीत दुखणे, दूध किंवा जेवण न जाणे अथवा असामान्य थकवा जाणवत असल्यास श्वसनमार्गातील संसर्गाचाही विचार करणे गरजेचे आहे. काही वेळा न्यूमोनियाची सुरुवात साध्या सर्दीसारख्या लक्षणांनी होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक खोकला प्रदूषणामुळेच होत आहे, असे गृहीत न धरता डॉक्टरांकडून योग्य तपासणी करून घेणे गरजेचे आहे. खोकला किती दिवसांपासून आहे, तो कोणत्या वेळी वाढतो आणि त्यासोबत कोणती लक्षणे दिसतात, यावरून त्यामागील कारणाचा अंदाज येऊ शकतो. विषाणूजन्य संसर्गामुळे होणारा खोकला हळूहळू कमी होऊ शकतो, तर प्रदूषणामुळे होणारा त्रास बाहेर गेल्यानंतर किंवा खराब हवेच्या संपर्कात आल्यानंतर वाढू शकतो. दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला राहिल्यास क्षयरोगासंबंधी तपासणी करावी. छातीचा एक्स-रे आणि काही आवश्यक चाचण्यांद्वारे त्याचे निदान करता येते. मात्र या सर्व आजारांची लक्षणे काही प्रमाणात सारखी असल्याने पालकांनी स्वतःहून निदान करू नये. वारंवार छातीत घरघर होणे, रात्रीच्या वेळी खोकला वाढणे किंवा सतत खोकला येणे ही दम्याची किंवा अॅलर्जीची लक्षणेही असू शकतात.
धोक्याची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय
मुलांना जोरजोरात श्वास घेणे, श्वास घेताना छाती आत ओढली जाणे, ओठ निळसर पडणे, बोलताना किंवा दूध पिताना त्रास होणे अथवा गुंगी येणे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी. तसेच वैद्यकीय सल्ल्याशिवाय खोकल्याची औषधे, अँटिबायोटिक्स किंवा घरगुती उपचार देणे टाळावे. यामुळे योग्य निदान आणि उपचारांना विलंब होऊ शकतो. मुलांचे श्वसन आरोग्य चांगले राखण्यासाठी पालकांनी काही प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे. हवेतील प्रदूषणाची पातळी जास्त असताना मुलांना बाहेर खेळण्यासाठी पाठवणे टाळावे. सिगारेटचा धूर, वाहनांचा धूर आणि धुळीच्या संपर्कापासून त्यांना दूर ठेवावे. तसेच वयानुसार आवश्यक लसीकरण वेळेत पूर्ण करावे, हातांची स्वच्छता राखावी आणि पुरेसे पाणी पिण्याची सवय लावावी. मुलांना सतत खोकला येत असल्यास किंवा त्यामुळे त्यांच्या झोपेवर, खाण्यापिण्यावर आणि दैनंदिन हालचालींवर परिणाम होत असल्यास केवळ खोकला आपोआप बरा होण्याची वाट पाहू नये. वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तपासणी केल्यास खोकल्यामागील कारण समजण्यास आणि योग्य उपचार सुरू करण्यास मदत होते.
प्रतिक्रिया व्यक्त करा