आयव्हीएफ उपचारांमध्ये गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी पूर्वी अनेकदा एकापेक्षा अधिक भ्रूण गर्भाशयात प्रत्यारोपित केले जात होते. मात्र, यामुळे जुळ्या किंवा त्याहून अधिक बाळांची गर्भधारणा होऊन आई आणि बाळाच्या आरोग्याशी संबंधित गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्यामुळे आता एका वेळी एकच भ्रूण प्रत्यारोपित करण्याच्या पद्धतीला प्राधान्य दिले जात असून, गर्भधारणेबरोबरच सुरक्षित प्रसूती आणि निरोगी बाळाच्या जन्मावर भर दिला जात आहे. नोवा आयव्हीएफ फर्टिलिटी, बाणेर, पुणे येथील प्रजननक्षमता तज्ज्ञ डॉ. रश्मी निफाडकर यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
एकापेक्षा अधिक भ्रूणांमुळे कोणते धोके?
डॉ. रश्मी निफाडकर सांगतात, आयव्हीएफ उपचारांच्या सुरुवातीच्या काळात गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी एका वेळी दोन किंवा त्यापेक्षा अधिक भ्रूण गर्भाशयात प्रत्यारोपित केले जात असत. मात्र, एकापेक्षा अधिक भ्रूण प्रत्यारोपित केल्यामुळे जुळ्या किंवा त्याहून अधिक बाळांची गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते. अशी गर्भधारणा दिसायला आनंददायी वाटत असली, तरी त्यामध्ये आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्याशी संबंधित अनेक धोके असू शकतात.
जुळ्या किंवा एकापेक्षा अधिक बाळांची गर्भधारणा झाल्यास मुदतपूर्व प्रसूती, बाळाचे जन्मावेळचे कमी वजन, गर्भावस्थेत उच्च रक्तदाब, गर्भावस्थेतील मधुमेह तसेच नवजात बालकांना अतिदक्षता विभागात उपचारांची गरज भासण्याची शक्यता वाढते. त्यामुळे आयव्हीएफ उपचारांमध्ये केवळ गर्भधारणा होण्यापेक्षा ती सुरक्षित आणि निरोगी असणे अधिक महत्त्वाचे ठरते.
सिंगल एम्ब्रियो ट्रान्सफर म्हणजे काय?
सिंगल एम्ब्रियो ट्रान्सफर पद्धतीमध्ये एका उपचार चक्रात एकच योग्य भ्रूण महिलेच्या गर्भाशयात प्रत्यारोपित केला जातो. आधुनिक आयव्हीएफ तंत्रज्ञानामुळे भ्रूणाची वाढ आणि विकास अधिक प्रभावीपणे तपासणे शक्य झाले आहे. त्यामुळे गर्भधारणेची क्षमता चांगली असलेल्या भ्रूणाची निवड करून प्रत्यारोपणाचा निर्णय घेता येतो.
यामध्ये ब्लास्टोसिस्ट कल्चर या तंत्राचाही वापर केला जातो. या प्रक्रियेत प्रयोगशाळेत भ्रूणाला पाच ते सहा दिवसांपर्यंत विकसित होऊ दिले जाते, असे डॉ. निफाडकर यांनी सांगितले.
प्रतिक्रिया व्यक्त करा