हिवाळ्याच्या दिवसांत संध्याकाळनंतर गारवा वाढतो आणि रात्रीच्या जेवणात गरमागरम खिचडी असेल, तर त्यासारखा आनंद नाही. खिचडी हलकी, पचायला सोपी आणि पोटाला आराम देणारी असते. पण या साध्या खिचडीची लज्जत वाढवायची असेल, तर ताटात काही खास जोडगोळीचे पदार्थ हवेत. पिढ्यानपिढ्या घराघरांत चालत आलेला हा पारंपरिक बेत केवळ चवीसाठी नाही, तर थंडीत शरीराला उब देण्यासाठीही महत्त्वाचा मानला जातो.
तूप, लोणचे आणि कढीची जोडगोळी
गरम खिचडीवर साजूक तूप सोडल्याशिवाय खिचडीची खरी मजा येत नाही. तुपामुळे खिचडीला खमंग सुगंध आणि मऊपणा येतो, तर थंडीत शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासही ते उपयुक्त मानले जाते. खिचडीसोबत मुरलेले आंबट-गोड लिंबाचे लोणचे असेल, तर प्रत्येक घास अधिक रुचकर लागतो. मऊ खिचडीसोबत लोणच्याची चटक चवीचा समतोल साधते. अनेक घरांत वर्षानुवर्षे मुरवलेले लोणचे आवडीने खाल्ले जाते. गरमागरम कढी हाही खिचडीचा अत्यंत आवडीचा साथीदार आहे. कढीचा हलका आंबट-गोड आणि खमंग स्वाद खिचडीच्या चवीला साथ देतो. थंडीच्या रात्री गरम कढी प्यायल्याने शरीराला उब मिळते आणि जेवण अधिक समाधानकारक वाटते.
टोमॅटो सार आणि थंडीतील जेवणाचा आनंद
खिचडीसोबत टोमॅटो सार घेतल्यास जेवणाला आणखी एक छान चव मिळते. गरम सार आणि वाफाळती खिचडी यांचा मेळ थंडीच्या दिवसांत विशेष आवडतो. हे पदार्थ साधे असले, तरी त्यांच्यामुळे रात्रीचे जेवण एक छान अनुभव बनते. थंडीच्या दिवसांत गरम, हलके आणि पचायला सोपे अन्न घेणे आरोग्यासाठीही चांगले मानले जाते. त्यामुळे यंदाच्या हिवाळ्यात खिचडीचा बेत आखताना हे पारंपरिक साथीदार ताटात नक्की ठेवा.
प्रतिक्रिया व्यक्त करा