मुंबईतील गोरेगाव रेल्वे स्थानकावर एका तरुणीने लोकल ट्रेनच्या मोटरमन केबिनच्या दरवाजाला लटकून धिंगाणा घातल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेली ही तरुणी केबिनच्या दरवाजाला लटकलेली दिसत असून, तिच्या या कृत्याने प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे.
दरवाजाला लटकून केबिनमध्ये जाण्याचा प्रयत्न
व्हिडीओमध्ये दिसते की, लाल स्कर्ट आणि हाय हिल्स घातलेली ही तरुणी मोटरमन केबिनच्या दरवाजाला लटकलेली आहे. ती केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचेही दिसत आहे. नशेत असलेली ही तरुणी दरवाजाच्या दोन्ही बाजूला असलेल्या हॅण्डलला पकडून स्वतःचे शरीर पूर्णपणे मागे झुकवताना दिसते. पश्चिम रेल्वेच्या गोरेगाव स्थानकावर घडलेली ही घटना दोन-तीन दिवसांपूर्वीची असल्याचे सांगितले जात आहे.
लोकल ट्रेन एकाच ठिकाणी उभी असल्याने सुदैवाने तरुणीला कोणतीही दुखापत झाली नाही. केबिनचा दरवाजा बंद असल्याने तिला आत जाता आले नाही. मात्र, हा प्रकार किती वेळ सुरू होता आणि ती तरुणी कोण आहे, असे प्रश्न या घटनेनिमित्त उपस्थित झाले आहेत.
रेल्वे पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष
व्हिडीओ समोर आल्यानंतर या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आता रेल्वे पोलीस याप्रकरणी काय कारवाई करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा