राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या हिताचे १४ निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील ३३ जिल्ह्यांतील लाखो शेतकऱ्यांना पुढील तीन महिने मोफत धान्य देण्यापासून ते आर्थिक फसवणूक करणाऱ्या संस्थांची मालमत्ता ९० दिवसांत जप्त करण्यासाठी स्वतंत्र न्यायाधिकरण स्थापण्यापर्यंतच्या महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.
शेतकरी, सिंचन आणि ठेवीदारांसाठी निर्णय
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील दारिद्र्यरेषेखालील (डीबीटी योजनेत समाविष्ट नसलेल्या) ३३ जिल्ह्यांतील ४२ लाख ३० हजार ७८३ शेतकऱ्यांना पुढील तीन महिने प्रति व्यक्ती ५ किलो मोफत धान्य (३ किलो तांदूळ आणि २ किलो गहू) मिळणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा-तापी वळण योजनेसाठी ५ हजार ५४८ कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे. सहा वळण बंधाऱ्यांच्या माध्यमातून सुमारे २६ हजार ५२६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार असून ११.५० मेगावॉट वीजनिर्मितीही केली जाईल.
ठेवीदारांची फसवणूक करणाऱ्या संस्थांच्या मालमत्ता जप्तीची प्रक्रिया वेगवान करण्यासाठी स्वतंत्र एमपीआयडी न्यायाधिकरण स्थापन केले जाणार असून ९० दिवसांत प्रकरण निकाली काढण्याची कालमर्यादा असेल. यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
विद्यार्थी, शिक्षक, कामगार आणि प्रशासन
आरोग्य विज्ञान व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल (ईबीसी, एसईबीसी, ईडब्ल्यूएस) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत भोजन, निवास आणि निर्वाह भत्त्यात भरीव वाढ मिळणार आहे.
शालार्थ प्रणालीत समाविष्ट शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आरबीआयकडे नोंदणीकृत बिगर बँकिंग वित्तीय संस्थांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. खाजगी अनुदानित शाळांच्या नियमनासाठी ‘महाराष्ट्र खाजगी अनुदानित शाळा (विनियमन) विधेयक, २०२६’ च्या प्रारूपास मंजुरी देण्यात आली आहे.
खाजगी अनुदानित आयुर्वेद व युनानी महाविद्यालयांमधील पूर्णवेळ ग्रंथपालांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार सुधारित वेतन संरचना लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम १९६९ आणि महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम १९८१ या कायद्यांमध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
राष्ट्रीय सहयोगी आणि आरोग्यसेवा व्यवसाय आयोग अधिनियम, २०२१ मधून अॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धती वगळण्याच्या विधेयकाच्या प्रारूपास मंजुरी देण्यात आली आहे. महसूल विभागातील अर्धन्यायिक कामकाजासाठी ‘रेव्हेन्यू कोर्ट केस मॅनेजमेंट सिस्टीम’ लागू होणार असून ‘एक जिल्हा एक अपील’ तरतुदीसाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मध्ये सुधारणा केली जाईल.
अभिनिर्णय फी आणि अपील फीच्या दरांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी मुद्रांक अधिनियम कलम ३२ (ब) आणि ५३ (१अ) मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय (रामटेक) अधिनियम १९९७ आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (नाशिक) अधिनियम १९८९ मधील कुलसचिव नियुक्ती, समित्या आणि लेखे यांच्या परिभाषांमध्ये एकसमानता आणण्यासाठी सुधारणा केली जाणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ मधील तरतुदींच्या सुधारणेस मान्यता देऊन हे विधेयक विधिमंडळासमोर मांडण्यास मंजुरी देण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यातील मौदा नगर पंचायतीच्या प्रशासकीय इमारत बांधकामासाठी शासकीय जमीन देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा