मराठी छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय आणि सामान्य माणसाच्या ज्ञानाचा कस पाहणारा कार्यक्रम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘कोण होणार करोडपती’ या शोवर सध्या प्रेक्षक नाराज असल्याचे चित्र आहे. प्रश्न-उत्तरांच्या या शोला सध्या प्रेक्षकांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागत आहे. यंदाच्या पर्वात सामान्य स्पर्धकांऐवजी हिंदी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींना अधिक पसंती दिली जात असल्याचा आरोप करत नेटकऱ्यांनी या शोला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
सध्या सुरू असलेल्या या नव्या पर्वाचे सूत्रसंचालन बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित करत आहे. माधुरी दीक्षित सूत्रसंचालक असल्याने कार्यक्रमात बॉलिवूड आणि हिंदी मनोरंजन विश्वातील कलाकारांची प्रमोशनसाठी ये-जा मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आतापर्यंत या पर्वात फराह खान, यामी गौतम, रवीना टंडन यांसारख्या बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली आहे. त्याचबरोबर कंटेंट क्रिएटर भुवन बाम हाही शोमध्ये आला होता, तर भोजपुरी अभिनेते रवी किशन हेदेखील शोमध्ये दिसले.
सामान्य स्पर्धकांना संधी मिळत नसल्याची भावना
एका मराठी रिॲलिटी शोमध्ये मराठी भाषिक सामान्य नागरिकांना आणि तळागाळातील बुद्धिमान स्पर्धकांना संधी मिळण्याऐवजी हिंदी सेलिब्रिटींचे प्रमोशन सुरू असल्याची भावना प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. हा कार्यक्रम सामान्य माणसाच्या स्वप्नांचा मंच राहिला नसून हिंदी चित्रपटांच्या प्रमोशनचा अड्डा झाला आहे, अशी टीकाही सोशल मीडियावर केली जात आहे.
सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या संतप्त प्रतिक्रिया
सोशल मीडियावर या शोचे प्रोमो आणि व्हिडीओ व्हायरल होत असताना कमेंट सेक्शनमध्ये प्रेक्षकांची नाराजी स्पष्टपणे दिसून येत आहे. काही नेटकऱ्यांनी मराठी वाहिनीवर हा शो का सुरू केला, असा सवाल उपस्थित केला आहे. काहींनी हा कार्यक्रम बंद करा किंवा हिंदी चॅनेलवर हलवा, अशी मागणीही केली आहे. या नाराजीमुळे ‘कोण होणार करोडपती’ हा शो सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा