मराठी मनोरंजनविश्वात मालिका, चित्रपट, वेब सीरिज आणि शॉर्ट फिल्म्स अशा विविध माध्यमांतून आपल्या अभिनयाची छाप उमटवणारा अभिनेता विश्वनाथ कुलकर्णी सध्या ‘रुणु झुणु’ या रोमँटिक गाण्यामुळे चर्चेत आहे. या गाण्यात तो पहिल्यांदाच लीड हिरो म्हणून रोमँटिक अंदाजात प्रेक्षकांसमोर आला आहे. गाण्याच्या निमित्ताने त्याने पहिल्यांदाच डान्सही केला आहे.
सिन्नरमधील शूटिंगचा मजेशीर किस्सा
‘रुणु झुणु’मधील विश्वनाथ कुलकर्णी आणि अभिनेत्री मीरा जोशी यांची जोडी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. दोघांमधील रोमँटिक केमिस्ट्री गाण्याला एक वेगळीच रंगत देते. रोमँटिक दृश्यांचं शूटिंग करताना मीरा जोशी यांनी विश्वनाथला खूप सहज आणि आरामदायी वाटेल असं वातावरण दिलं. त्यामुळे दोघांनाही दृश्यांमध्ये नैसर्गिकपणे व्यक्त होता आलं आणि पडद्यावर त्यांची केमिस्ट्री अधिक खुलून आली. गाण्यातील पहिलं दृश्य सिन्नर येथील ऐतिहासिक गोंदेश्वर मंदिर परिसरात सकाळी शूट होत होतं. त्याचवेळी तिथे शाळेची सहल आली. शाळेतील मुलं या जोडीकडे कुतूहलाने पाहू लागली. तेव्हा त्यांच्या शिक्षिकेने मुलांना, “त्यांना त्रास देऊ नका, त्यांचं प्री-वेडिंग शूट सुरू आहे,” असं सांगितलं. प्रत्यक्षात ते गाण्याचं शूटिंग होतं; मात्र विश्वनाथ आणि मीरा यांची जोडी इतकी खरी आणि सहज वाटत होती की, उपस्थितांनाही ते प्री-वेडिंग शूट असल्याचा भास झाला. हा प्रसंग दोघांसाठीही खूप मजेशीर आणि अविस्मरणीय ठरला.
पहिल्यांदाच डान्स आणि नव्या संधींची अपेक्षा
विश्वनाथच्या मते, त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीला मिळालेली ही एक प्रकारची पावतीच होती. तसेच, चेतन गरुड आणि वीणा गरुड यांनी या जोडीची केलेली निवड किती योग्य होती, हेही या प्रसंगातून अधोरेखित झालं. अभिनयाचा अनुभव असला तरी ‘रुणु झुणु’च्या निमित्ताने विश्वनाथने पहिल्यांदाच डान्स केला. त्यामुळे हा अनुभव त्याच्यासाठी खास होता. मीरा जोशी आणि नृत्यदिग्दर्शकांच्या सहकार्यामुळे हा अनुभव अधिक आनंददायी ठरला. हे गाणं Suman Music Marathi या YouTube चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आलं आहे. चेतन गरुड आणि वीणा गरुड यांच्या निर्मिती व दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या गाण्याला हर्षवर्धन वावरे आणि कस्तुरी वावरे यांचे स्वर लाभले आहेत. ट्रिनिटी ब्रदर्स यांनी गाण्याचं संगीत आणि गीताची जबाबदारी सांभाळली आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गाणं २.५ लाख व्ह्यूजचा टप्पा लवकरच गाठणार असून, विश्वनाथ आणि मीरा यांच्या जोडीला प्रेक्षकांकडून पसंती मिळत आहे. कलाकार म्हणून प्रत्येक नवीन प्रोजेक्ट आपल्याला काहीतरी शिकवतो, असं विश्वनाथ मानतो. ‘रुणु झुणु’ने त्याला रोमँटिक हिरो म्हणून स्वतःला सादर करण्याची संधी दिली. आता या अनुभवाच्या जोरावर चित्रपट, वेब सीरिज, मालिका आणि इतर मनोरंजन माध्यमांमध्ये आणखी मोठ्या आणि प्रमुख भूमिका साकारण्याची त्याची तयारी आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा