पुण्यातील बोपदेव घाट परिसरात संध्याकाळच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. घाटाच्या उतारावरून प्रचंड वेगाने येणारा एक ट्रक थेट बस स्टॉपवर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या घोळक्यात घुसला. या धडकेत दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पुणे शहर सुन्न झाले आहे.
जवळच एक महाविद्यालय असून संध्याकाळी महाविद्यालय सुटल्यानंतर विद्यार्थी घरी जाण्यासाठी निघाले होते. त्यापैकी अनेक विद्यार्थी रस्त्याच्या कडेला असलेल्या बस स्टँडवर उभे होते, तर काही विद्यार्थी रस्त्याच्या बाजूने पायी चालत जात होते. त्याचवेळी उतारावरून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्यांना चिरडले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी धावपळ उडाली आणि आरडाओरडा झाला.
ब्रेक फेल झाल्याचा प्राथमिक अंदाज
प्राथमिक माहितीनुसार ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ही दुर्घटना घडल्याचा दावा केला जात आहे. रस्त्यावर त्यावेळी वाहनांची फारशी गर्दी नव्हती आणि ये-जा सुरळीत सुरू होती. मात्र उतारावरून वेगाने येत असताना ट्रकसमोर एक कार आणि रिक्षा आली. त्यांना वाचवण्यासाठी चालकाने ट्रक रस्त्याच्या कडेला घेतला. त्यानंतर वेग जास्त असल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याच्या कडेला पायी जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर आदळला. धडकेनंतरही ट्रक त्याच वेगाने पुढे गेला.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली घटना
ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आवाजासह कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो पाहून अंगावर काटा येतो, अशी प्रतिक्रिया उमटत आहे. घाटाच्या उतारावर वाहनांचा वेग आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता याबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. या अपघाताची नेमकी कारणे आणि पुढील तपशील समोर येणे बाकी आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा