एका कस्टम अधिकाऱ्याने तब्बल २० वर्षे रोज एकाच व्यक्तीची झडती घेतली, तरी त्याला तस्करीचा कोणताही पुरावा सापडला नाही. विशेष म्हणजे, तो व्यक्ती दररोज यशस्वीपणे तस्करी करत राहिला आणि पुढे करोडपतीही बनला. अखेर तो नेमकी कशाची तस्करी करत होता? वाळूच्या पिशव्यांमध्ये काय लपलेलं होतं? हे कोडं सध्या चर्चेत आहे.
२० वर्षे रोज झडती, तरी हाती काहीच नाही
हा तस्कर रोज सायकलवरून यायचा. त्याच्या सायकलवर वाळूने भरलेल्या दोन पिशव्या असायच्या. कस्टम अधिकारी रोज त्याला अडवून त्याची कसून तपासणी करायचा. वाळूच्या पिशव्या पूर्णपणे तपासल्या जायच्या, सायकलचा प्रत्येक भाग तपासला जायचा. अगदी मेटल डिटेक्टर आणि मॅग्निफाइंग ग्लास यांसारख्या साधनांचाही वापर केला जायचा. तपासणीसाठी उपलब्ध असलेलं प्रत्येक तंत्रज्ञान वापरूनही अधिकाऱ्याच्या हाती काहीच लागत नव्हतं. दिवसभर तस्करीचा माल विकल्यानंतर संध्याकाळी हा व्यक्ती पुन्हा सायकलवरून घरी परतायचा. जाताना तो त्या कस्टम अधिकाऱ्याला हसत हात दाखवून जायचा. असं करता करता तब्बल २० वर्षे उलटली, पण अधिकाऱ्याला त्याचं रहस्य काही उलगडलं नाही.
अखेर उलगडलेलं गुपित
अधिकारी निवृत्त झाल्यानंतर एके दिवशी त्याने त्या तस्कराला गाठलं आणि थेट विचारलं, मी तब्बल २० वर्षं तुझी रोज झडती घेतली, पण मला कधीच काही सापडलं नाही. अखेर तू नेमकी कोणत्या वस्तूची तस्करी करत होतास? त्यावर तस्कराने हसत उत्तर दिलं, सायकलची! होय, तो रोज एका नव्या कोऱ्या सायकलची तस्करी करत होता. वाळूने भरलेल्या दोन पिशव्या केवळ कस्टम अधिकाऱ्याचं लक्ष विचलित करण्यासाठी ठेवल्या जायच्या. प्रत्यक्षात तो सायकलच तस्करीचा माल म्हणून घेऊन जायचा आणि संध्याकाळी ती विकून घरी चालत परतायचा. जाताना नेहमीप्रमाणे अधिकाऱ्याला हात दाखवून जायचा. अशा प्रकारे रोज एक सायकल याप्रमाणे २० वर्षांत त्याने जवळपास ७ हजार सायकलींची तस्करी केली आणि विशेष म्हणजे, हे सगळं तो कस्टम अधिकाऱ्याच्या डोळ्यांदेखत करत होता. अधिकारी मात्र आयुष्यभर वाळूच्या पिशव्यांमध्ये आणि सायकलच्या भागांमध्ये तस्करीचा माल शोधत राहिला!
प्रतिक्रिया व्यक्त करा