इजिप्तमधील प्राचीन थीब्स मंदिराच्या अवशेषांजवळ कचरा हटवण्याचे काम सुरू असताना संशोधकांना एक अनपेक्षित शोध लागला. ढिगाऱ्यातून ठक ठक असा आवाज येताच खोदकाम थांबवण्यात आले आणि आतून जे बाहेर आले, ते पाहून सर्वजण थक्क झाले. तिथे सुमारे ३४०० वर्षे जुने, जळालेले पपायरसचे ४० तुकडे सापडले. हे तुकडे टपाल तिकिटाएवढे लहान असले तरी त्यांचे महत्त्व मात्र प्रचंड असल्याचे संशोधक सांगतात.
या शोधाची माहिती ‘जर्नल ऑफ द इजिप्शियन लँग्वेज अँड एंटिक्विटीज’ या नियतकालिकात छापून आली आहे. या तुकड्यांचा संबंध प्राचीन इजिप्तमधील प्रसिद्ध अपोफिस विधीशी असल्याचे मानले जाते. या विधीच्या माध्यमातून सूर्यदेवतेच्या प्रकोपाची कामना केली जात असे. पुरातत्त्व विभागासाठी हे तुकडे मोठा खजिनाच ठरले आहेत.
सूर्यदेवतेचा शाप आणि अपोफिस विधी
अपोफिसला सूर्यदेवता रा यांचा कायमचा शत्रू मानले जात होते. सापाच्या रूपातील हा देव अराजकता, आग आणि अंधाराचे प्रतीक होता. इजिप्तच्या पुजाऱ्यांनी सुरुवातीला हा मंत्र सूर्यदेवता रा यांच्या मदतीसाठी तयार केला होता. अपोफिसशी युद्ध करताना रा यांना बळ मिळावे, हा त्यामागचा हेतू होता.
काळानुसार या विधीचा वापर बदलत गेला. नंतर याच विधीचा उपयोग फारोच्या शत्रूंना शाप देण्यासाठी होऊ लागला. बिघडलेले हवामान आणि विषासारख्या संकटांपासून बचावासाठीही लोक या विधीचा आधार घेत असत, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
संशोधकांची धारणा का बदलली
सूर्यदेवतेचा प्रकोप करण्याची ही पद्धत अलिकडच्या काळातील असावी, असे आतापर्यंत मानले जात होते. मात्र आता सापडलेल्या पुराव्यांवरून ही पद्धत अतिप्राचीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. या आधी अपोफिस विधीचे एकमेव लिखित रेकॉर्ड चौथ्या शतकाच्या अखेरीचे मानले जात होते. नव्या तुकड्यांमुळे त्या समजुतीला छेद गेला आहे.
या विधीवर केवळ धार्मिक नेत्यांचाच अधिकार होता, असेही संशोधकांना आधी वाटत होते. मात्र थीब्समधील मंदिराच्या अवशेषांत सापडलेल्या तुकड्यांनी ही धारणाही बदलली आहे. कोपनहेगन विद्यापीठातील इजिप्तशास्त्रज्ञ या शोधाचा सखोल अभ्यास करत आहेत. या तुकड्यांमधून प्राचीन इजिप्तच्या धार्मिक जीवनाविषयी आणखी नवी माहिती समोर येण्याची अपेक्षा आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा