अंतराळात अण्वस्त्रे तैनात करण्यावर १९६७ च्या आंतरराष्ट्रीय कराराने बंदी असतानाही, रशियाने अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असलेला स्पुटनिक-एस नावाचा सॅटेलाईट तयार केल्याचा दावा जर्मन माध्यमांनी केला आहे. जर्मन आणि पाश्चात्त्य गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानुसार, रशिया डिसेंबर २०२६ पर्यंत हा सॅटेलाईट अंतराळात प्रक्षेपित करण्याच्या तयारीत आहे. या वृत्ताची नाटो प्रमुख मार्क रुटे आणि जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्झ यांनी गंभीर दखल घेतली आहे.
स्पुटनिक-एस म्हणजे काय? डिसेंबरची मुदत का?
जर्मनीच्या डब्ल्यूडीआर, एनडीआर आणि झुडडॉइचे झायटुंग या माध्यमांच्या संयुक्त शोधमोहिमेत हा खुलासा करण्यात आला आहे. गुप्तचर अहवालानुसार, रशियाने काही वर्षांपूर्वीच स्पुटनिक-एस नावाचा अण्वस्त्रवाहू सॅटेलाईट विकसित केला असून, सध्या तो मॉस्को परिसरात ठेवण्यात आला आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला नाटो सदस्य देशांना देण्यात आलेल्या गुप्तचर माहितीमध्ये असा इशारा देण्यात आला आहे की, हा सॅटेलाईट पुढील ६० दिवसांच्या आत, म्हणजेच डिसेंबर अखेरपर्यंत पृथ्वीच्या कक्षेत पाठवला जाऊ शकतो. यावर प्रतिक्रिया देताना जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्झ म्हणाले की, या बातम्या नवीन नसल्या तरी त्या कमी धक्कादायक नाहीत आणि रशिया कोणत्या थराला जाण्यास तयार आहे, हे यातून स्पष्ट होतं. तर नाटोचे सरचिटणीस मार्क रुटे यांनीही या धोक्याला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचं म्हटलं आहे.
स्फोट झाला तर काय होईल? रशियाचं उत्तर काय?
संरक्षण तज्ज्ञांच्या मते, रशियाचा उद्देश पृथ्वीवर थेट अणुबॉम्ब टाकणं हा नसून, शत्रू राष्ट्रांची सॅटेलाईट प्रणाली उद्ध्वस्त करणं हा असू शकतो. जर पृथ्वीच्या खालच्या कक्षेत या अण्वस्त्राचा स्फोट घडवला गेला, तर त्यातून निर्माण होणाऱ्या तीव्र किरणोत्सर्गामुळे अंतराळातील हजारो सॅटेलाईट एकाच वेळी निकामी होऊ शकतात. त्याचे थेट परिणाम जगभरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होतील. जागतिक इंटरनेट सेवा, मोबाईल नेटवर्क आणि हवाई वाहतूक नियंत्रण ठप्प होऊ शकतं, तर नेव्हिगेशन प्रणाली बंद पडल्याने जागतिक व्यापार, बँकिंग व्यवहार आणि लष्करी हालचालींवर मोठा आघात होईल. कायदेशीरदृष्ट्या अंतराळात कोणतेही अण्वस्त्र तैनात करण्यास पूर्णपणे बंदी आहे. १९६७ साली अमेरिका, तत्कालीन सोव्हिएत युनियन आणि ब्रिटनसह अनेक देशांनी आउटर स्पेस ट्रीटी या करारावर स्वाक्षरी केली आहे. या कराराच्या कलम ४ नुसार, पृथ्वीच्या कक्षेत कोणतेही अण्वस्त्र किंवा महासंहारक शस्त्र प्रक्षेपित करणं अथवा तैनात करणं हा आंतरराष्ट्रीय कायद्याचा गंभीर भंग मानला जातो. दुसरीकडे, रशियाने हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह आणि बर्लिनमधील रशियन दूतावासाने हा पाश्चात्त्य देशांचा निराधार अपप्रचार असल्याचं म्हटलं आहे. रशियाने १९६७ च्या कराराचं नेहमीच पालन केलं असून, अंतराळात अण्वस्त्रे तैनात करण्याचा कोणताही हेतू नसल्याचं मॉस्कोने स्पष्ट केलं आहे. मात्र, अमेरिका आणि युरोपीय देश रशियाच्या अंतराळ हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहेत.
प्रतिक्रिया व्यक्त करा