ऑल इंडिया इमाम्स ऑर्गनायझेशनचे प्रमुख डॉ. इमाम उमर इलियासी यांनी शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या लग्नाबाबत शरीयत कायद्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे विधान केले आहे. एका मुलाखतीत त्यांना शाहरुख आणि गौरी यांचे लग्न शरीयानुसार योग्य आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर दिलेल्या उत्तरामुळे या विषयावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
मुलाखतीदरम्यान डॉ. इलियासी यांनी लव्ह जिहाद, धर्मांतर आणि हिंदू-मुस्लिम विवाह यांसारख्या विषयांवर उघडपणे मते मांडली. इस्लामिक कायदा, शरिया याबाबतही त्यांनी भाष्य केले. शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या लग्नाचा उल्लेख झाल्यानंतर त्यांना या लग्नाच्या वैधतेबद्दल विचारण्यात आले.
शरीयत कायद्याबाबत काय म्हणाले?
डॉ. इलियासी यांनी सांगितले की, जर एखाद्या मुस्लिम पुरुषाने ज्यू किंवा ख्रिश्चन महिलेशी लग्न केले, तर त्या महिलेला दुसऱ्या धर्मात धर्मांतर करण्याची आवश्यकता नसते. मात्र, जर एखाद्या मुस्लिम पुरुषाने हिंदू किंवा इतर धर्माच्या महिलेशी लग्न केले, तर त्या महिलेला दुसऱ्या धर्मात धर्मांतर करणे आवश्यक असते, असे त्यांनी स्पष्ट केले.
शाहरुख मुस्लिम आहे आणि त्याची पत्नी गौरी हिंदू आहे. गौरीने लग्नानंतर धर्मांतर केले नाही. त्यामुळे शाहरुखचे लग्न इस्लामी दृष्टिकोनातून कायदेशीर आहे का, असे विचारले असता डॉ. इलियासी म्हणाले की, शरीयत कायद्यानुसार नवरा आणि बायको दोघेही मुस्लिम असणे आवश्यक आहे. जर गौरी हिंदू असेल, तर शरीयत कायदा त्याला परवानगी देत नाही. शरीयत कायद्याचे स्वतःचे नियम आहेत. जर ते त्याचे पालन करत नसतील, तर त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, असेही ते म्हणाले.
शाहरुख-गौरी यांचा प्रवास
शाहरुख खान आणि गौरी खान यांना बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक मानले जाते. शाहरुख मुस्लिम आहे, तर गौरीचा जन्म एका हिंदू पंजाबी कुटुंबात झाला. शाहरुखने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वीच, 1991 मध्ये गौरीशी लग्न केले. मात्र, गौरीने धर्मांतर केले नाही.
लग्नानंतर शाहरुख आणि गौरी यांना 1997 मध्ये पहिला मुलगा झाला, त्याचे नाव आर्यन ठेवण्यात आले. त्यांची मुलगी सुहाना खान हिचा जन्म 2000 साली झाला. 2013 मध्ये त्यांचा धाकटा मुलगा अबराम खान याचा जन्म सरोगसीद्वारे झाला. डॉ. इलियासी यांच्या विधानानंतर शाहरुख-गौरी यांच्या लग्नाबाबतची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा