हृदयविकार, रक्तदाब आणि मधुमेहासारख्या गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांमध्येच औषधाचे मूळ घटक नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जेजुरीमध्ये इंडयूकेअर फार्मास्युटिकल अँड रिसर्च फाउंडेशन या कंपनीने अशी बनावट औषधे तयार केल्याचे तपासात उघड झाले आहे. या कंपनीचा औषध उत्पादन परवाना अन्न व औषध प्रशासनाने रद्द केला आहे.
रुग्णालयालाही पुरवठा; कोट्यवधींचा साठा जप्त
या कंपनीने पिंपरी-चिंचवडमधील वायसीएम रुग्णालयालाही औषधांचा पुरवठा केला होता. त्यामुळे रुग्णांना औषधांच्या नावाखाली प्रत्यक्षात औषधी घटक नसलेल्या गोळ्या आणि द्रव पदार्थ दिले जात होते. कंपनीने उत्पादनाची परवानगी नसतानाही नऊ प्रकारच्या औषधांचे उत्पादन आणि विक्री केल्याचे तपासात आढळले आहे. यातील काही औषधे बनावट असल्याचेही स्पष्ट झाले आहे. वायसीएम रुग्णालयातून या कंपनीने पुरवलेल्या सुमारे १ कोटी ७२ लाख रुपये किमतीच्या निकृष्ट औषधांचा साठा ४ नोव्हेंबर रोजी जप्त करण्यात आला.
तपासणीत काय आढळले आणि पुढे काय?
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ परिसरात असलेल्या कंपनीच्या औषध उत्पादन केंद्राची अन्न व औषध प्रशासनाने यावर्षी १४ आणि १५ जुलै रोजी तपासणी केली होती. या तपासणीत औषध तयार करण्याच्या प्रक्रियेत २५ गंभीर चुका आढळल्या होत्या. त्यानंतर ७ सप्टेंबर रोजीही संस्थेचे परवाने रद्द करण्यात आले होते. नुकत्याच केलेल्या तपासणीत कंपनीच्या ‘आयबीयुप्लस’ आणि ‘कॅरेविटा-एम’ या औषधांमध्ये औषध म्हणून काम करणारे मूळ घटकच आढळले नाहीत. त्यामुळे ही औषधे बनावट असल्याचे घोषित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ‘कॅरेगिल-४००’ या औषधाच्या तब्बल १३ लाख ८६ हजार गोळ्या कोणतीही नोंद न करता तयार करण्यात आल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी प्रशासनाने २९ ऑक्टोबर रोजी कंपनीला कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. कंपनीने दिलेले उत्तर आणि २३ नोव्हेंबर रोजी झालेली प्रत्यक्ष सुनावणी यानंतर पुणे विभागाचे सह आयुक्त (औषधे) यांनी कंपनीचे फॉर्म २५ आणि फॉर्म २८ अंतर्गत असलेले औषध उत्पादन परवाने रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे कंपनीला औषधांचे उत्पादन, पॅकिंग आणि वितरण तातडीने थांबवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. विनापरवाना औषधांचे उत्पादन केल्याप्रकरणी कंपनीविरोधात औषधे आणि सौंदर्यप्रसाधने कायदा १९४० अंतर्गत न्यायालयीन कारवाई केली जाणार आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणत्याही औषध उत्पादकाला सोडले जाणार नाही, असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.
Leave a Reply