देशभरात सध्या एका लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. आमदार अनंत सिंह यांची मुलगी शिवांगी सिंह हिचे लग्न आज होत आहे. या लग्नात पाच लाख पाहुण्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. पाहुण्यांना आणण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली असून, घोडे आणि शाही भोजनाचा थाट उभा करण्यात आला आहे.
या लग्नात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. व्हीव्हीआयपी आणि सामान्य पाहुण्यांना एकसारखेच जेवण दिले जाणार आहे. व्हीव्हीआयपी पाहुण्यांसाठी सुमारे दहा एकर जमिनीवर भव्य मांडव उभारण्यात आला आहे, तर सामान्य पाहुण्यांसाठी सुमारे पंधरा बिघा जमिनीत सात मांडव उभारून जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
जेवणात काय काय असणार?
जेवणात पुलाव, पुरी, डाळ, रायता, तीन प्रकारच्या भाज्या, पनीरची भाजी, डाळ मखनी, लिट्टी-चोखा, नान, तंदूरी रोटी, सॅलड, पापड आणि लोणचे वाढले जाणार आहे. स्टार्टरमध्ये चाट, गोलगप्पे, आलू टिक्की, डोसा, इडली, चाऊमीन, पिझ्झा, पास्ता आणि बर्गर असणार आहेत. मिठाईत रसमलाई, गुलाबजामून, काजू कतली, राजभोग, मालपुआ आणि खाजा असे अनेक प्रकार असतील.
रसमलाईसाठी ५० हजार लिटर दूध
आतापर्यंत ८० टनांहून अधिक रसमलाई तयार करण्यात आली आहे. ही रसमलाई ५० हजार लिटर दुधापासून बनवली जात आहे. पाचशेहून अधिक कारागीर तीनशे चुलींवर लग्नाचे जेवण तयार करणार आहेत. लग्नात सुमारे चार लाख लोकांचा सहभाग अपेक्षित असून, पाच लाख पाहुण्यांसाठी जेवण तयार केले जाईल. तसेच तीस स्टॉल्सवर वेगवेगळे पदार्थ मिळणार आहेत.
लग्न लदमा गावात होत आहे. गावात प्रवेश करताच एक भव्य द्वार उभारण्यात आले आहे. हे द्वार अनंत सिंह यांचे मोठे भाऊ दिलीप सिंह यांच्या स्मरणार्थ बनवण्यात आले आहे. गावातील रस्ता अरुंद असल्याने गावात जाम लागू नये म्हणून सर्व गाड्या गावाबाहेरच थांबवल्या जात आहेत.
Leave a Reply