हिवाळा सुरू झाला की सकाळच्या वेळी वातावरणात धुक्याची चादर पसरलेली दिसते. अशा आल्हाददायक वातावरणात मॉर्निंग वॉकला जाण्याचा मोह अनेकांना होतो. सकाळी चालल्यामुळे शरीर सक्रिय राहते, मन प्रसन्न होते आणि हृदयाच्या आरोग्यालाही फायदा होतो. मात्र, धुक्यात चालणे प्रत्येक वेळी आरोग्यासाठी फायदेशीर असेलच असे नाही. कारण धुक्यासोबत वातावरणातील धूळ, धूर आणि सूक्ष्म प्रदूषक कणही असू शकतात. त्यामुळे सकाळी धुक्यात चालावे की नाही, हे केवळ धुक्याच्या प्रमाणावर नव्हे तर त्या वेळच्या हवेच्या गुणवत्तेवरही अवलंबून असते.
धुक्यात चालण्याचे फायदे आणि धोके
हवेची गुणवत्ता चांगली असेल आणि धुक्यामुळे दृश्यमानता कमी होण्यापलीकडे कोणताही प्रदूषणाचा धोका नसेल, तर सकाळी चालण्याचे अनेक फायदे मिळू शकतात. नियमित चालण्यामुळे हृदयाची कार्यक्षमता सुधारण्यास, रक्ताभिसरण चांगले राहण्यास आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. रोजच्या दिनक्रमात चालण्याचा समावेश केल्यास हृदयविकाराचा धोका कमी करण्यासही मदत होऊ शकते. चालण्यामुळे शरीरातील कॅलरी खर्च होतात, वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते, तणाव कमी होतो आणि झोपेची गुणवत्ता सुधारते. तसेच पायांचे स्नायू सक्रिय राहतात.
धुके म्हणजे नेहमीच प्रदूषण असे नाही. मात्र, काही वेळा धुक्यासोबत धूर आणि प्रदूषक कण हवेत साचू शकतात. विशेषतः हिवाळ्यात काही हवामान परिस्थितींमध्ये प्रदूषकांचे प्रमाण वाढू शकते. हवेतील सूक्ष्म प्रदूषक कण श्वासावाटे शरीरात प्रवेश करू शकतात. यामुळे डोळ्यांची जळजळ, खोकला, घशात खवखव आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. प्रदूषण जास्त असताना बाहेर व्यायाम केल्यास शरीरात जाणाऱ्या प्रदूषकांचे प्रमाण वाढू शकते.
दमा, सीओपीडी किंवा इतर श्वसनविकार असणाऱ्या व्यक्तींना थंड हवा आणि प्रदूषणामुळे त्रास वाढू शकतो. अशा वेळी खोकला, छातीत घट्टपणा किंवा धाप लागण्याची लक्षणे जाणवू शकतात. थंड हवामानात रक्तवाहिन्या आकुंचन पावू शकतात. त्यामुळे काही व्यक्तींमध्ये रक्तदाब आणि हृदयावरील ताण वाढू शकतो. हृदयविकार असणाऱ्यांनी अतिथंड किंवा प्रदूषित वातावरणात जोरदार चालणे टाळावे. दाट धुक्यामुळे रस्ते, वाहने आणि समोरून येणारे लोक स्पष्ट दिसत नाहीत, त्यामुळे वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यांवर धुक्यात चालणे टाळावे.
वॉकला जाण्यापूर्वी काय तपासावे
बाहेर चालायला जाण्यापूर्वी आपल्या परिसरातील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक (AQI) तपासणे महत्त्वाचे आहे. समोरचे स्पष्ट दिसत नसेल, वाहनांची वर्दळ असेल किंवा वातावरणात धूर आणि धुक्याचे मिश्रण जाणवत असेल, तर बाहेर चालायला जाऊ नका. दृश्यमानता कमी असल्यास सुरक्षिततेचाही धोका असतो. सकाळीच चालायला गेले पाहिजे असे नाही; हवेची गुणवत्ता सुधारल्यानंतर किंवा दिवसाच्या उजेडात वॉकला जाण्याचा विचार करा. वाहनांची जास्त वर्दळ असलेले रस्ते, बांधकाम सुरू असलेली ठिकाणे, औद्योगिक परिसर आणि धूर असणाऱ्या भागांमध्ये चालणे टाळा. शक्य असल्यास स्वच्छ हवा असलेला सुरक्षित मार्ग निवडा.
चालताना खोकला, घशात खवखव, डोळ्यांची जळजळ, धाप लागणे, चक्कर येणे किंवा छातीत अस्वस्थता जाणवल्यास लगेच चालणे थांबवा. छातीत दुखणे किंवा श्वास घेण्यास तीव्र त्रास होत असल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्या. दमा किंवा सीओपीडीसारखे श्वसनविकार असणाऱ्या व्यक्ती, हृदयविकार किंवा फुफ्फुसांचे आजार असणाऱ्या व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि गर्भवती महिला यांनी धुक्यात मॉर्निंग वॉक टाळावा.
टीप : वरील माहिती केवळ सामान्य माहितीसाठी आहे. कोणतेही उपचार, आहार किंवा औषधे घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Leave a Reply