कॉकरोच जनता पार्टीने उद्या नागपूरमध्ये मोर्चा आयोजित केला आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके छत्रपती संभाजीनगरहून नागपूरकडे रवाना झाले आहेत. रवाना होण्यापूर्वी त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. गोकुळ दूध डेरीच्या राजकारणावरून त्यांनी सरकारला लक्ष्य केले.
संविधान दिनी नागपुरात मोर्चा
उद्या संविधान दिवस आहे. हा दिवस फक्त कॉकरोच जनता पार्टीसाठी नाही, तर संपूर्ण देशासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे, असे दीपके म्हणाले. आपला देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानावर चालतो. सत्तेत बसलेले काही लोक संविधानविरोधी मानसिकतेचे आहेत. त्यांनी सगळ्या संस्था हायजॅक करून संविधानाला पूर्णपणे बाजूला ठेवून तानाशाही चालवली आहे, असा आरोप दीपके यांनी केला. या विरोधात मोर्चा असणार असून हा देश फक्त आंबेडकरांच्या संविधानावर चालेल, असा संदेश देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मोर्चाला परवानगी आहे का, यावर दीपके म्हणाले की, त्यांना परवानगी मिळाली आहे आणि कसल्याही प्रकारची नोटीस आलेली नाही. महाराष्ट्र पोलीस दिल्ली पोलिसांसारखे नाहीत, त्यांचे नेहमी सहकार्य असते, असेही ते म्हणाले. निवडणुका पारदर्शकपणे होत नसतील तर अशा लोकांचा काय फायदा, असे म्हणत त्यांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
गोकुळ प्रकरणावरून सरकारवर टीका
गोकुळमध्ये काय झाले, ते आपण बघितले. दूध डेरीची निवडणूकसुद्धा हे लोक सोडत नाहीत, अशी टीका दीपके यांनी केली. दूध डेरीची निवडणूक हरली तरी सरकारमधून चार सदस्य दिले जातात. काहीही करून दूध डेरी त्यांच्या हातात आली पाहिजे, असा त्यांचा प्रयत्न असतो, असे दीपके म्हणाले. दूध डेरीच्या निवडणुकीत जर असे करत असतील, तर राज्यस्तरीय निवडणुकीत हे काय करत असतील, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
गोकुळमध्ये शासन नियुक्त सदस्यांची बाजू न्यायालयात मांडण्यासाठी वकिलांना ८० लाख रुपयांची फी दिल्यावरही दीपके यांनी टीका केली. गोकुळमधील चार शासकीय सदस्यांची पदे वाचवण्यासाठी वकिलांना ८० ते ९० लाख रुपये दिले जात आहेत, असे ते म्हणाले. राज्यात दुष्काळ पडला आहे, मग शेतकऱ्यांना किती पैसे दिले, असा सवाल त्यांनी केला. काहीही करून सत्ता काबीज करायची ही भूक असल्याची टीकाही त्यांनी केली.
Leave a Reply