गेल्या नऊ ते दहा महिन्यांपासून शासनाकडून डिझेल अनुदानाअंतर्गत होणारा डिझेल पुरवठा बंद असल्याने मालवणमधील डिझेलधारक ट्रॉलर नौका मालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मच्छिमारी व्यवसायच धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे.
डिझेल पुरवठ्यासाठी मच्छिमार नौकांचा बल्क वर्गात समावेश केल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. परतावा थांबल्यामुळे मच्छिमारांना किरकोळ विक्रेत्यांकडून प्रतिलिटर १४८ रुपये दराने डिझेल विकत घ्यावे लागत आहे. या दरात मासेमारी करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे मच्छिमारांचे म्हणणे आहे.
नौकांची संख्या घटली
मालवण बंदरावर पूर्वी सुमारे ३५० ट्रॉलर नौका होत्या. आता तेथे केवळ ४० डिझेल नौका शिल्लक राहिल्या आहेत, अशी माहिती मच्छिमार प्रतिनिधी विकी चोपडेकर यांनी दिली. मार्च २०२६ पासून मच्छिमार संस्थांनी डिझेल उचललेले नाही. किरकोळ दराने डिझेल घेणे संस्थांना आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याने त्या बंद होण्याच्या उंबरठ्यावर आहेत.
डिझेल परतावा पुन्हा सुरू झाला नाही, तर कसेबसे मासेमारी करणारे नौका मालकही हा व्यवसाय सोडतील, असा इशारा देण्यात आला आहे. डिझेल नौका आणि मच्छिमार संस्था टिकल्या पाहिजेत, अन्यथा डिझेल नौकांवरील मच्छिमार नामशेष होतील आणि मच्छिमार संस्था केवळ प्रमाणपत्रे देण्यापुरत्याच मर्यादित राहतील, असे प्रतिनिधींनी सांगितले.
स्वतंत्र वर्गीकरणाची मागणी
मालवण दांडी येथे मालवण मच्छिमार ट्रॉलर मालक संघटनेच्या सदस्यांची बैठक झाली. बैठकीनंतर प्रतिनिधींनी पत्रकारांशी बोलताना आपल्या अडचणी आणि मागण्या मांडल्या. डिझेलधारक ट्रॉलर मच्छिमारांसाठी बल्क वर्गाऐवजी स्वतंत्र वर्गीकरण करून पूर्वीप्रमाणे डिझेल पुरवठा आणि परतावा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली.
मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे आणि मालवण-कुडाळचे आमदार निलेश राणे यांनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन मच्छिमारांना न्याय द्यावा, अशी विनंती करण्यात आली. संतोष खांडरे यांनी राज्य सरकारने डिझेल परतावा पूर्वीप्रमाणे सुरू ठेवण्याचा सकारात्मक निर्णय घ्यावा आणि आगामी हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न मांडून मच्छिमारांना न्याय द्यावा, अशी मागणी केली. मालवणचा पारंपरिक मासेमारी व्यवसाय टिकवण्यासाठी सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, असे प्रतिनिधींनी सांगितले.
प्रतिक्रिया व्यक्त करा