अमेरिकेच्या प्रशासनाने भारतासह एकूण चौदा भागीदार देशांवर नवे आयात शुल्क लादण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. बुधवारी ही घोषणा करण्यात आली असून, या देशांमधील अतिरिक्त औद्योगिक क्षमता अमेरिकेच्या व्यापारासाठी धोकादायक ठरत असल्याचे कारण देण्यात आले आहे. या वृत्ताची माहिती एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिली आहे.
हे शुल्क लगेच लागू होणार नाही. अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कार्यालयाने कलम ३०१ अंतर्गत सुमारे आठ महिने चौकशी केली असून, त्यानंतरच हा प्रस्ताव समोर आला आहे. या चौकशीत सोळा भागीदार देशांमधील कथित अन्याय्य व्यापार पद्धतींची तपासणी करण्यात आली होती.
कोणत्या देशांवर शुल्क लागू होणार?
प्रस्तावित शुल्क चीन, भारत, बांगलादेश, कंबोडिया, युरोपियन युनियन, इंडोनेशिया, जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया, स्वित्झर्लंड, तैवान, थायलंड आणि व्हिएतनाम या देशांवर लागू होईल. मात्र मेक्सिको आणि नॉर्वे यांना या यादीतून वगळण्यात आले आहे. अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या देशांनी उत्पादन क्षेत्रात गरजेपेक्षा अधिक क्षमता उभी केली असून, त्यातून होणारे अतिरिक्त उत्पादन अमेरिकेसाठी चिंतेचे आहे.
या शुल्काचा दर दहा किंवा साडेबारा टक्के नसेल. जुलै २०२६ मध्ये लादण्यात आलेल्या शुल्काच्या तुलनेत यावेळी वेगवेगळ्या देशांसाठी वेगवेगळी मर्यादा ठेवण्यात आली आहे. युरोपियन युनियन, जपान, दक्षिण कोरिया आणि तैवानसाठी ही मर्यादा १५ टक्के असून, मलेशियासाठी ती १९ टक्के ठेवण्यात आली आहे. प्रत्येक देशावर नेमके किती शुल्क लादले जाईल, याचा सविस्तर अहवाल बुधवारी अमेरिकेच्या फेडरल रजिस्टरमध्ये प्रसिद्ध होणार आहे.
भारताची भूमिका काय?
दरम्यान, भारताने अमेरिकेचे दावे फेटाळले आहेत. औद्योगिक आणि व्यापार धोरणांमुळे भारताची उत्पादनक्षमता वाढली असली, तरी कोणत्याही क्षेत्रात गरजेपेक्षा अधिक उत्पादन होत नसल्याचे भारताचे म्हणणे आहे. अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधीने भारतावर २५ टक्के शुल्क लादण्याचा निर्णय घेतला असून, दोन्ही देशांमध्ये व्यापार करार झाल्यास हा दर १७ टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतो, असेही सांगण्यात येत आहे. अमेरिकेकडून जारी करण्यात आलेले प्रसिद्धीपत्रक भारत सरकारने फेटाळले आहे.
चीननेही अमेरिकेचे आरोप फेटाळले असून, देशातील स्पर्धात्मक वातावरणामुळे निर्यात वाढल्याचे म्हटले आहे. भारत आणि व्हिएतनामसोबतचे अमेरिकेचे व्यापार करार अद्याप पूर्ण झालेले नाहीत, त्यामुळे पुढील वाटाघाटींवर सर्वांचे लक्ष असणार आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा