आमदार रोहित पवार यांच्याकडून नागपुरात काढण्यात येणाऱ्या न्यायहक्क ट्रॅक्टर मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जाऊ नये, असा पक्षाकडून आदेश देण्यात आला होता. त्यामुळे रोहित पवार आपल्याच पक्षात एकटे पडल्याची चर्चा सुरू झाली होती. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएसोबत सत्तेत सामील झाल्यास रोहित पवार वेगळा निर्णय घेऊ शकतात, अशीही चर्चा जोरात सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार वेगळी भूमिका घेणार नाहीत, असा दावा त्यांनी केला. ते मंगळवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
देशमुख म्हणाले, रोहित पवार शरद पवारांच्या शब्दाबाहेर नाहीत
मतदारसंघ पुनर्रचनेला आम्ही आमच्या अटींवर समर्थन दिलं आहे. पन्नास टक्के मतदारसंख्या वाढ समान प्रमाणात केली जाणार असल्याने हे समर्थन दिल्याचं सुप्रिया सुळे यांनी आधीच स्पष्ट केलं आहे, असं अनिल देशमुख म्हणाले. २६ नोव्हेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा प्रमुखांची दुष्काळासंदर्भात बैठक बोलावली आहे. या बैठकीत रोहित पवारांच्या मोर्च्यावरही चर्चा होईल, असं त्यांनी सांगितलं. रोहित पवार हे शरद पवारांच्या शब्दाच्या पलीकडे नाहीत, त्यामुळे ते वेगळी भूमिका घेणार नाहीत, असंही देशमुख म्हणाले.
दुसरीकडे भाजपचे नेते परिणय फुके यांनी शरद पवार गटाकडून रोहित पवारांचे पंख छाटण्यात आल्याचा दावा केला आहे. रोहित पवार यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटाला मागे टाकण्याचा प्रयत्न असल्याचं फुके म्हणाले. पक्षात पुन्हा फूट पडेल, अशी भीती सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांना असल्याचं त्यांनी म्हटलं. रोहित पवार स्वतःला सर्वांत मोठा नेता सिद्ध करण्यासाठी कधी अजित पवारांच्या अपघातावर बोलतात, कधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बोलतात, कधी एमपीएससीसारख्या वेगवेगळ्या विषयांवर बोलत राहतात, अशी टीका फुके यांनी केली.
पक्षात एकटे पडल्याची चर्चा का रंगली?
शरद पवार गट लवकरच एनडीएसोबत जाऊ शकतो, अशी चर्चा गेले अनेक दिवस सुरू आहे. संसदेत लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचना विधेयकाला त्यांच्याकडून पाठिंबा दिला जाईल, असं सांगितलं जातं. त्या बदल्यात शरद पवार गटाला राज्यात दोन मंत्रीपदं आणि केंद्रात एक मंत्रीपद मिळेल, अशीही चर्चा आहे. मात्र, रोहित पवार सातत्याने सरकारविरोधी भूमिका घेत आहेत. पुनर्रचना विधेयकालाही त्यांचा विरोध असून अजित पवार यांच्या अपघाताचा मुद्दा त्यांनी सातत्याने लावून धरला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी गंभीर आरोपही केले होते.
गेल्या काही काळापासून रोहित पवारांना पक्षात दुय्यम वागणूक दिली जात असल्याची चर्चा आहे. त्यांच्यासोबत लढणारे विकास लवांडे, राज राजापूरकर, सुनील माने आणि रवी वरपे ही मंडळी प्रसारमाध्यमांसमोर रोहित पवार यांची भूमिका मांडत असतात. या सर्वांकडे असलेलं प्रवक्तेपद पक्षाने काढून टाकलं होतं. रोहित पवार यांना फ्रंटल सेलचे प्रमुख म्हणून महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, गेल्या पाच-सहा महिन्यांत एकाही फ्रंटल सेलच्या प्रमुखाने त्यांची भेट घेतलेली नाही किंवा पक्षातील घडामोडींचा अहवाल सादर केलेला नाही. रोहित पवार यांना समकक्ष असं आणखी एक पद तयार करण्यात आलं असून सुनील गव्हाणे यांना ते पद देण्यात आलं आहे. त्यांच्याकडे सर्व फ्रंटल प्रमुखांच्या कामाचा आढावा घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या सगळ्यामुळे पक्षाने रोहित पवार यांचे पंख छाटल्याची चर्चा सुरू आहे.
Leave a Reply