गायनावर आधारित ‘इंडियन आयडल: लेजेंड्स रिटर्न्स’ या शोची सध्या प्रचंड चर्चा आहे. या शोच्या आगामी भागात तब्बल 21 वर्षांनंतर हिमेश रेशमिया आणि इम्रान हाश्मी ही जोडी पुन्हा एकत्र येत आहे. ‘गनमास्टर G9’ या सिनेमाद्वारे दोघेही एकत्र येत आहेत. या शोमध्ये इम्रान हाश्मीने आपली ऑनस्क्रीन हिरोइन जेनेलिया डिसूझासोबत हजेरी लावली.
प्रमोशनदरम्यान दोघांची मस्ती आणि धमाल पाहायला मिळाली. या शोमध्ये इम्रान आणि हिमेश यांच्यातील बॉण्डिंग दिसून आले. इम्रानची रोमँटिक बाजूही यात दिसली — त्याने स्पर्धकांच्या हातावर किस केले आणि जेनेलियाला गुडघ्यावर बसून प्रपोज केले. दोघांनी रोमँटिक डान्सही केला.
व्हायरल झालेला क्षण
दोघांनी सिनेमातील ‘दर्द ए दिल, दर्द ए जिगर’ या गाण्याचा रोमँटिक सीन पुन्हा साकारला. स्टेजवर दोघे बेंचवर बसलेले दिसतात. एका क्षणी इम्रानने आपल्या ओठांनी जेनेलियाचे कानातले काढले. अभिनेत्री हसते. या शोच्या प्रोमोतील हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून इंटरनेटवर त्यावरून चर्चांना उधाण आले आहे.
नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया
या व्हिडीओवरून काही नेटकऱ्यांनी अभिनेत्यावर टीका केली आहे. एकाने कमेंटमध्ये म्हटले की, ‘विचार करा, जर कोणत्या तरुणीने रितेश देशमुखसोबत असं केलं असतं तर? लोकांनी गोंधळ घातला असता.’ आणखी एकाने ‘जेनेलियाने अशा क्रिंच अॅक्टिव्हिटीमध्ये सहभागी होऊ नये’ असे म्हटले, तर एका नेटकऱ्याने ‘फॅमिली शोमध्ये असे चीप स्टंट करणे चुकीचे आहे’ असे म्हटले आहे.
दुसरीकडे काहींनी दोघांना समर्थनही दर्शवले आहे. ‘दोघेही केवळ सिनेमातील सीन रिक्रिएट करत आहेत’ असे त्यांचे म्हणणे आहे.
Leave a Reply