शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत सामील होणार आणि त्यानंतर शरद पवारांचा पक्ष एनडीएसोबत जाणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आरपीआय नेते रामदास आठवले यांनी मोठा दावा केला आहे. २०१९ मध्ये शरद पवार एनडीएसोबत आले असते तर २०२२ मध्ये ते देशाचे राष्ट्रपती झाले असते, असं आठवले म्हणाले. मात्र, शरद पवार एनडीएसोबत यायला तयार नाहीत, असंही त्यांनी म्हटलं आहे.
अजित पवार हयात असते तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या असत्या, असंही आठवले म्हणाले. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय चांगला असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
आठवले नेमकं काय म्हणाले?
माध्यमांशी बोलताना आठवले म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील की नाही, हे माहीत नाही. पण अजित पवार असते तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतचा निर्णय होऊ शकला असता. अजित पवारांच्या जाण्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील की नाही, हे सांगता येत नाही. शरद पवार एनडीएमध्ये येणार की नाही, हाही त्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. पवार साहेबांनी एनडीएमध्ये येण्याचा निर्णय घेतला तर दोघांचं एकत्रीकरण व्हायला अडचण नाही, असं आठवले म्हणाले.
शरद पवारांची भूमिका अनेक वेळा मांडली गेली आहे की, ते एनडीएसोबत जाणार नाहीत. जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारखे समाजवादी नेतेही एनडीएमध्ये होते, असं आठवले यांनी आठवण करून दिली. ममता बॅनर्जी, नितीश कुमार, शरद यादव, नवीन पटनायक आणि करुणानिधी हे नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात एनडीएमध्ये होते आणि त्याचे अध्यक्ष स्वतः फर्नांडिस होते, असं ते म्हणाले. देशाच्या विकासासाठी नरेंद्र मोदींचा अजेंडा असून अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर आली आहे, ५० कोटी लोक गरिबी रेषेच्या वर आले आहेत आणि मेक इन इंडियाला मोठं महत्त्व दिलं जात आहे, असंही आठवले म्हणाले. देश प्रगतीच्या दिशेने जात असताना शरद पवारांसारख्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाणीव असणाऱ्या नेत्याने एनडीएसोबत येण्याचा निर्णय घ्यायला हवा होता, असं त्यांचं मत आहे.
जर शरद पवार साहेबांनी २०१९ मध्ये एनडीएसोबत येण्याचा निर्णय घेतला असता, तर ते कदाचित २०२२ मध्ये देशाचे राष्ट्रपतीही होऊ शकले असते. पण त्यांनी तेव्हा तो निर्णय घेतला नाही आणि अजूनही त्यांची भूमिका एनडीएमध्ये न येण्याचीच आहे, त्यामुळे एकत्रीकरण होईल की नाही, हे सांगता येत नाही, असं आठवले म्हणाले.
महिला आरक्षण आणि पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा
पवार साहेबांच्या पक्षाने मात्र एक चांगला निर्णय घेतला आहे, असं आठवले म्हणाले. महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. त्यांच्या पक्षाचे आठ खासदार आहेत. त्यामुळे आता महिला आरक्षण विधेयक मंजूर होण्यासाठी अडथळे दिसत नाहीत, असं ते म्हणाले. २०-२५ वर्षांनंतर पुनर्रचना करण्याची तरतूद संविधानात आहे, त्यामुळे पुनर्रचनेला विरोध करण्याची आवश्यकता नाही, असंही त्यांनी म्हटलं. छोटे मतदारसंघ झाले तर अनेक जणांना निवडणूक लढण्याची संधी मिळेल, असं आठवले म्हणाले.
राहुल गांधींवरही टीका
राहुल गांधी विरोधी पक्षनेते म्हणून आपली जबाबदारी पार पाडत नाहीत, असं मतही आठवले यांनी मांडलं. संविधान कोणीही बदलू शकत नाही, असं त्यांना वाटतं. राहुल गांधींचा प्रचार हा राजकीय प्रचार असून त्यांची भूमिका लोकशाहीला घातक असल्याचं आठवले म्हणाले. राहुल गांधी देशाच्या बाहेर जातात आणि देशाची बदनामी करतात, असे अनेक अनुभव गेल्या दहा वर्षांत आले आहेत, असं ते म्हणाले. विरोधी पक्षनेत्याला प्रश्न उपस्थित करण्याचा आणि सरकारने काय केलं पाहिजे, हे सांगण्याचा अधिकार आहे. मात्र, राहुल गांधींची विधानं अनेक वेळा वादग्रस्त असतात. मोदींवर टीका करण्याचा अधिकार आहे, पण चुकीच्या पद्धतीने टीका करण्याची त्यांची सवय असल्याने अनेक वेळा वाद निर्माण होतो, असं आठवले म्हणाले.
Leave a Reply