जळगाव जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. चाळीसगाव तालुक्यातील जागा बिनविरोध न होण्यावरून पक्षात वाद उफाळला असून, तालुकाप्रमुख राहुल पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
बिनविरोध जागेवरून आरोप-प्रत्यारोप
जिल्हा बँक निवडणुकीत भाजपने शिवसेनेच्या सहा उमेदवारांना बिनविरोध निवडून येण्यास मदत केली होती. त्यामुळे चाळीसगावची जागाही बिनविरोध होणे अपेक्षित होते, असे राहुल पाटील यांनी म्हटले होते. मात्र माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे ते शक्य झाले नाही, असा आरोप त्यांनी केला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उमेदवारी मागे घेण्याचे निर्देश दिले असतानाही संबंधित उमेदवारांनी माघार घेतली नाही, असा दावाही राहुल पाटील यांनी केला होता.
पक्षविरोधी कारवायांमुळे हकालपट्टी
उन्मेश पाटील पक्ष एखाद्या खासगी कंपनीप्रमाणे चालवत असून जुन्या कार्यकर्त्यांना डावलत असल्याचा आरोपही राहुल पाटील यांनी केला होता. या आरोपांनंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोहर पाटील यांनी राहुल पाटील यांच्या हकालपट्टीचे पत्र जारी केले. पक्षविरोधी कारवाया आणि शिस्तभंगाबाबत यापूर्वी समज देऊनही सुधारणा न झाल्याने ही कारवाई केल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे राहुल पाटील यांची प्राथमिक सदस्यत्वासह पक्षातील सर्व पदांवरून हकालपट्टी झाली आहे.
Leave a Reply