आज जवळपास प्रत्येक स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर असतो. फोन अनलॉक करण्यापासून बँकिंग अॅप उघडण्यापर्यंत आणि पैसे भरण्यापर्यंत अनेक कामं या सेंसरमुळे चुटकीसरशी होतात. बोट सेंसरवर ठेवलं की त्याच्या रेषा ओळखून फोन उघडतो. मात्र माणसाच्या मृत्यूनंतर हाच सेंसर बोटांचे ठसे ओळखण्यात का चुकतो, असा प्रश्न अनेकांना पडतो. कारण मृत्यूनंतरही बोटांवरील रेषा गायब होत नाहीत. मग नेमकं काय बदलतं, यामागचं विज्ञान समजून घेऊ.
कॅपेसिटिव्ह सेंसर कसा काम करतो?
फोनमधील अनेक फिंगरप्रिंट सेंसर कॅपेसिटिव्ह तंत्रज्ञानावर काम करतात. बोटाचा पृष्ठभाग सपाट नसतो; त्यावर लहान उठावदार रेषा आणि त्यांच्यामध्ये रिकाम्या जागा असतात. याच रेषांना फिंगरप्रिंट म्हणतात आणि प्रत्येक माणसाचा ठसा वेगळा असतो. बोट सेंसरवर ठेवलं की सेंसर बोट आणि सेंसरदरम्यान तयार होणाऱ्या अतिशय लहान विद्युत बदलांना मोजतो. त्यातून कोणती जागा उठावदार आणि कोणती खाली आहे, हे कळतं. त्यानंतर फोन ही माहिती आधी जतन केलेल्या ठशाशी तपासतो आणि दोन्ही जुळले तर फोन उघडतो.
मृत्यूनंतर शरीरात काय बदल होतो?
व्यक्तीच्या मृत्यूनंतर हृदयाचे ठोके थांबतात आणि रक्तसंचार ठप्प होतो. पेशींना ऑक्सिजन आणि पोषक घटक मिळणं बंद होतं. जिवंत माणसाच्या त्वचेत पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स असतात, जे त्वचेच्या विद्युत गुणांवर परिणाम करतात. मृत्यूनंतर काही वेळाने त्वचेची आर्द्रता आणि विद्युत गुण बदलतात. त्यामुळे कॅपेसिटिव्ह सेंसरला बोटांकडून पूर्वीसारखी विद्युत प्रतिक्रिया मिळत नाही आणि तो ठसा योग्य प्रकारे वाचू शकत नाही. मात्र मृत्यूनंतर लगेच शरीरातील सर्व विद्युत क्रिया एकाच वेळी संपत नाहीत; पेशींमध्ये काही वेळ अवशिष्ट प्रतिक्रिया सुरू राहू शकतात. त्यामुळे प्रत्येक फोन आणि परिस्थितीत सेंसर काम करणं बंद करेलच, असं नाही.
सर्वच फिंगरप्रिंट सेंसर एकसारखे काम करत नाहीत. कॅपेसिटिव्ह सेंसर बोट आणि सेंसरदरम्यानचे विद्युत बदल ओळखतो, ऑप्टिकल सेंसर प्रकाशाच्या मदतीने बोटाच्या रेषांचा फोटो तयार करतो, तर अल्ट्रासॉनिक सेंसर ध्वनिलहरींच्या मदतीने बोटाचा पृष्ठभाग ओळखतो. मृत्यूनंतर प्रत्येक सेंसरचा प्रतिसाद वेगळा असल्याने काही सेंसर परिस्थितीनुसार ठसा ओळखून प्रतिसाद देतातही, तर काही देत नाहीत. महत्त्वाचं म्हणजे मृत्यूनंतर बोटांच्या रेषा गायब होत नाहीत, त्यामुळे फॉरेन्सिक तज्ज्ञ मृत व्यक्तीच्या बोटांचे ठसे ओळख पटवण्यासाठी वापरू शकतात.
Leave a Reply