मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

पाणी वाया घालवले तर ₹२,००० दंड; मानवत नगरपालिकेचा निर्णय

परभणी जिल्ह्यातील मानवत शहरात पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर दोन हजार रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे. शहरात साडेसहा हजार नळजोडण्या आहेत.

पाणी वाया घालवले तर ₹२,००० दंड; मानवत नगरपालिकेचा निर्णय

राज्यात यंदा दुष्काळाची दाहकता आत्तापासूनच जाणवत असून अनेक जलसाठे कोरडे पडले आहेत. शेतातील तळे आणि विहिरींचेही पाणी आटल्याने शेतकरी चिंतेत आहे. जनावरांना पाणी आणि चारा देण्याचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. शहरातील नागरिकांना पुरेसे पिण्याचे पाणी पुरवण्याचेही आव्हान प्रशासनापुढे आहे. या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील मानवत शहरात पाण्याची नासाडी करणाऱ्यांकडून दोन हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे.

सहा हजारांहून अधिक नळजोडण्या, दररोज २० लाख लिटर पाणी

मानवत शहरात सुमारे सहा हजार पाचशे नळजोडण्या असून २८ विभागांमधून नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. दररोज शहराला सुमारे २० लाख लिटर पाणी उपलब्ध करून दिले जाते. मात्र, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याऐवजी काही नागरिकांकडून पाण्याची नासाडी होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा वापर आवश्यकतेनुसारच करावा, असे आवाहन नगरपालिकेने केले आहे. पिण्याच्या पाण्याचा गैरवापर किंवा नासाडी करताना आढळल्यास संबंधित नागरिकांना दोन हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

कायद्याचा आधार, संमिश्र प्रतिक्रिया

महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ अन्वये पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर ही दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा नगर परिषद प्रशासनाने दिला आहे. पाणी वाया घालवणाऱ्यांविरोधात जाहीर प्रकटनही प्रसिद्ध करण्यात आले आहे. या निर्णयावर नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून काहींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे, तर काहींनी त्याला विरोधही दर्शवला आहे.

दरम्यान, राज्यात दुष्काळाचे परिणाम मोठ्या प्रमाणावर दिसत असून मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत रब्बीच्या पिकांना फटका बसला आहे. ज्वारीच्या पेरणीवरही पाऊस-पाणी नसल्याचा परिणाम जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर शासनाने ३१० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला असून शक्य ती मदत करण्यात येत आहे. मात्र, नोव्हेंबर महिन्यातच अशी परिस्थिती असल्याने उन्हाळ्यात काय परिस्थिती निर्माण होईल, अशी चर्चा गावच्या पारावर होत आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance