ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची प्रमुख भूमिका असलेला ‘आदी अनंत’ हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात सराफ यांच्यासोबत संकर्षण कऱ्हाडे यांचीही मुख्य भूमिका आहे. चित्रपटाच्या प्रचारात कलाकार सध्या व्यस्त असून, प्रेक्षकांकडून या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. अशातच एका गुजराती तरुणीने तयार केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
थिएटरमध्ये फक्त दोघेच प्रेक्षक
तरुणीने मराठी भाषेत हा व्हिडीओ तयार केला आहे. ‘आदी अनंत’ पाहण्यासाठी ती चित्रपटगृहात गेली होती. तिच्या म्हणण्यानुसार, चित्रपटगृहात तिच्याशिवाय आणि तिच्या मित्राशिवाय दुसरं कुणीही नव्हतं. मध्यंतराच्या वेळी तिने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला. संपूर्ण थिएटर रिकामं असल्याचं तिने व्हिडीओमध्ये सांगितलं आणि याबद्दल तिने नाराजी व्यक्त केली.
मराठी माणसंच येत नाहीत, तरुणीचा सवाल
‘मराठी चित्रपटांची अवस्था का वाईट आहे, कलाकारांना पुढे यश का मिळत नाही, मराठी चित्रपट का चालत नाहीत, याचं उत्तर आज मला मिळालं,’ असं तरुणी व्हिडीओमध्ये म्हणते. अशोक सराफ यांसारखे दिग्गज कलाकार चित्रपटात असतानाही मराठी माणूस मराठी चित्रपट पाहायला येत नाही, असं तिचं म्हणणं आहे. ‘मी गुजराती असूनही हा चित्रपट पाहायला आले. मी महाराष्ट्राच्या परंपरेचा आणि मराठी भाषेचा खूप आदर करते. माझी मातृभाषा मराठीच आहे, असं समजा,’ असंही तिने सांगितलं.
‘तुम्ही तुमच्या कलाकारांना पाठिंबा देत नाही, तुमच्या चित्रपटांना पाठिंबा देत नाही. आपल्याच माणसाला आपण पाठिंबा देत नाही आणि म्हणतो की आपण पुढे जात नाही. कलाकारांचा थोडा आदर ठेवा,’ असं आवाहन तिने व्हिडीओतून केलं. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यावर नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.
Leave a Reply