भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय क्रिकेट मालिका बंद असल्या, तरी दोन्ही संघांमधील क्रिकेट सामने काही बंद झाले नाहीत. गेल्या 14 महिन्यांत भारत आणि पाकिस्तानचे संघ तब्बल 14 वेळा एकमेकांसमोर उभे होते. या सामन्यांमध्ये फक्त वरिष्ठ पुरुष संघच नाही, तर महिला संघ, 19 वर्षांखालील संघ आणि उदयोन्मुख खेळाडूंच्या संघांचाही समावेश आहे. त्यामुळे एकीकडे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय क्रिकेट संबंधांवर बंदी असताना दुसरीकडे बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये वारंवार भारत-पाकिस्तान सामने कसे खेळले जात आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
14 महिन्यांत 14 सामने; द्विपक्षीय मालिका मात्र बंद
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटची कसोटी मालिका 2007 मध्ये खेळवण्यात आली होती. त्या वर्षी दोन्ही देशांमध्ये एकूण 10 सामने झाले होते. त्यामध्ये पाच एकदिवसीय सामने, तीन कसोटी सामने आणि टी-20 विश्वचषकातील दोन सामन्यांचा समावेश होता. मात्र, आता द्विपक्षीय मालिका बंद असतानाही गेल्या 14 महिन्यांत दोन्ही देशांचे संघ 14 वेळा आमनेसामने आले आहेत. या आकडेवारीमुळे क्रिकेट प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. जर भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय क्रिकेट खेळण्यास विरोध असेल, तर बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये या दोन्ही संघांना वारंवार एकाच गटात का ठेवले जाते, अशी चर्चा सुरू आहे. आशियातील या दोन बलाढ्य संघांना वेगवेगळ्या गटांत ठेवणे शक्य असतानाही त्यांना एकाच गटात ठेवण्याचा निर्णय घेतला जातो.
मैदानावर क्रिकेट कमी, वादच जास्त
आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत भारत ‘अ’ संघाला पाकिस्तान ‘अ’ संघाकडून 48 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. हा सामना जिंकल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंनी मैदानावर आक्रमकपणे जल्लोष केला. दुसरीकडे, भारतीय खेळाडूंनी सामना संपताच ड्रेसिंग रूमचा रस्ता धरला. याआधी दिवाळीच्या काळात झालेल्या अंडर-19 आशिया कपमध्येही पाकिस्तानने भारताचा पराभव करत असाच जल्लोष केला होता. मात्र, अंतिम सामन्यात भारताने विजय मिळवत त्या पराभवाचा हिशेब चुकता केला.
दिवाळीला दोन आठवडे उलटत नाहीत तोच भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामने झाले आहेत. या सामन्यांमध्ये खेळाडूंनी एकमेकांशी हस्तांदोलन न करणे, मैदानावर शाब्दिक चकमकी होणे आणि विजयाचा जल्लोष करताना आक्रमक हावभाव करणे, अशा घटना वारंवार पाहायला मिळत आहेत. याआधीही अनेक घटनांनी क्रिकेटमधील वातावरण तापवले आहे. हस्तांदोलन करण्यास नकार, साहिबजादा फरहानचा बंदुकीतून गोळीबार केल्यासारखा जल्लोष आणि हरिस रौफचे वादग्रस्त हावभाव यामुळे खेळापेक्षा खेळाडूंच्या वर्तनाचीच अधिक चर्चा झाली. अशा घटनांमुळे भारत-पाकिस्तानमधील क्रिकेटची स्पर्धा आता केवळ खेळापुरती मर्यादित राहिली आहे का, असा प्रश्न निर्माण होतो.
आशिया कपच्या ट्रॉफीवरूनही वाद
भारत-पाकिस्तान क्रिकेटमधील तणाव फक्त मैदानापुरता मर्यादित नाही. आशिया कपमध्ये भारतीय पुरुष आणि महिला संघांनी विजेतेपद पटकावूनही ट्रॉफी मिळण्याचा वाद अद्याप चर्चेत आहे. दोन्ही भारतीय संघांना विजेतेपद मिळूनही त्यांच्या ट्रॉफीचा प्रश्न सुटलेला नाही. विशेष म्हणजे, आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख अशी दुहेरी भूमिका सांभाळणारे मोहसिन नक्वी यांच्यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी ट्रॉफी भारतात आणण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, या प्रकरणामुळे एसीसीच्या कार्यपद्धतीवरही टीका होत आहे.
अलीकडच्या काळात वरिष्ठ पुरुष आशिया कप, अंडर-19 आशिया कप आणि रायझिंग स्टार्स आशिया कप अशा विविध स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ वारंवार आमनेसामने आले आहेत. या सामन्यांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतो. टीआरपी, जाहिराती आणि प्रसारण हक्कांच्या माध्यमातून आयोजक आणि प्रसारकांना मोठा आर्थिक फायदा होतो. त्यामुळे भारत-पाकिस्तान सामन्यांची लोकप्रियता लक्षात घेता, आशियाई क्रिकेट परिषद आणि संबंधित क्रिकेट बोर्डांच्या व्यावसायिक हितसंबंधांवर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे, अशी चर्चा सुरू आहे.
Leave a Reply