गायक आणि संगीतकार सलीम कोडाथूर यांनी नुकताच एक धक्कादायक अनुभव सगळ्यांसमोर मांडला. सुमारे दहा वर्षांपूर्वी मित्राच्या सल्ल्यावरून त्यांनी त्वचा उजळवणारी एक क्रीम वापरायला सुरुवात केली होती. सुरुवातीला ही गोष्ट साधी वाटली, पण काही महिन्यांतच त्यांच्या शरीरात गंभीर बदल दिसू लागले.
त्यांच्या पापण्या आणि पाय सुजू लागले. रोगप्रतिकारशक्तीही कमजोर झाली. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांच्या शरीरातील अल्ब्युमिन या महत्त्वाच्या प्रथिनाचे प्रमाण कमी झाल्याचे समोर आले. प्रथिनांचे प्रमाण असेच कमी राहिले, तर किडनी निकामी होऊ शकते, असा इशाराही डॉक्टरांनी दिला होता.
किडनीच्या आजाराचे निदान आणि महिनोन्महिने उपचार
किडनीची बायोप्सी केल्यानंतर सलीम यांना मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथी हा आजार असल्याचे निदान झाले. या आजाराच्या उपचारासाठी त्यांना कित्येक महिने रुग्णालयात राहावे लागले. पाचशे रुपयांना घेतलेली ही क्रीम त्यांनी एक वर्षाहून अधिक काळ वापरली होती.
आजही आरोग्याच्या तक्रारी त्यांचा पाठलाग करत आहेत. विशेषतः झोपेची समस्या अजूनही कायम आहे. दिवसातून केवळ दोन ते तीन तासच झोप मिळते, त्यामुळे काही काळानंतर त्यांना झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागल्या, असेही त्यांनी सांगितले.
तरुणीचाही असाच अनुभव; पोलिसांकडे तक्रार
अशाच प्रकारचा अनुभव मलप्पुरम येथील एका १७ वर्षीय तरुणीलाही आला. समाजमाध्यमांवरील जाहिरात पाहून तिने ही क्रीम मागवली होती. त्या जाहिरातीत मुरुमे, काळे डाग आणि पिगमेंटेशन दूर होईल, असा दावा करण्यात आला होता. क्रीम वापरायला सुरुवात केल्यानंतर तिचा रक्तदाब अचानक कमी झाला आणि तिचे पायही सुजले.
या तरुणीने वापरलेल्या क्रीमचा नमुना पोलिसांना दिला असून, तिने तक्रारही दाखल केली आहे. सलीम यांनाही या त्रासामुळे आपले कार्यक्रम पुढे ढकलावे लागले होते. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमजोर झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले, असेही त्यांनी सांगितले.
Leave a Reply