सोमवार, २३ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

जळगाव महापालिकेत राडा; वादग्रस्त वक्तव्यावरून नगरसेवक बाहेर

जळगाव महापालिकेच्या महासभेत शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक इ.बा. पटेल यांच्या महिलांबाबतच्या वक्तव्यावरून गोंधळ उडाला; महापौरांनी दोघांना सभागृहाबाहेर काढले.

जळगाव महापालिकेत राडा; वादग्रस्त वक्तव्यावरून नगरसेवक बाहेर

राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये आता लोकप्रतिनिधी निवडून गेल्यामुळे लोकांच्या प्रश्नांना आणि शहराच्या विकासाला प्राधान्य देण्यासाठी हक्काची नेतेमंडळी महापालिकेत बसली आहेत. महापालिकेतील सर्वसाधारण सभा, महासभेच्या माध्यमातून नगरसेवक, महापौरांकडून शहर विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा होते. मात्र, जळगाव मनपाच्या महासभेत शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकाने आपण सत्ताधारी नगरसेवक नसल्याचे सांगत, गरीब नगरसेवक असल्याचे सांगताना आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर मोठा गोंधळ उडाला. यावेळी महापौर दीपमाला काळे यांनी संबंधित नगरसेवकाला खडे बोल सुनावत सभागृहाच्या बाहेर जाण्याचे आदेश दिले.

जळगाव शहरातील विविध विकासकामांच्या संदर्भात महापालिकेच्या महासभेत चर्चा सुरू होती. यावेळी आपली भूमिका आणि मत मांडत असताना शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक इ.बा. पटेल यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्याने चांगलाच वाद उद्भवला. माझ्याकडे वॉर्डातील लोक येतात, कामासंदर्भात विचारणा करतात, पण मी गरीब नगरसेवक आहे, सत्ताधारी पक्षाचा नगरसेवक नाही. त्यामुळे आमच्या कामांना प्राधान्य दिले जात नसल्याचे सांगताना पटेल यांनी ‘गरीब की बीवी सबकी भाभी होती है…’ अशा प्रकारचे वक्तव्य केले होते.

पटेल यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या आणि भाजपच्या नगरसेवकांसह महापौर दीपमाला काळे यांनीही संबंधित वक्तव्यावर आक्षेप नोंदविला. तर यावेळी भाजप नगरसेवक विजय बांदल हे इबा पटेल यांच्या अंगावर धाऊन गेल्याचे पाहायला मिळाले. या प्रकारामुळे महापालिकेच्या महासभेत चांगलाच गोंधळ झाला. दरम्यान, जळगाव महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळे ठाकरेंच्या नगरसेवकांना सत्ताधारी डावलतात, असा आरोप आहे.

## महापौरांनी दोन्ही नगरसेवकांना बाहेर काढले

महापौर दीपमाला काळे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत नगरसेवक इबा पटेल यांच्यासह विजय बांदल यांनाही दहा मिनिटांसाठी सभागृहाच्या बाहेर जाण्याचे आदेश दिले. अखेर दोन्ही नगरसेवक सभागृहाच्या बाहेर गेल्यानंतर पुन्हा एकदा महासभा सुरळीत सुरू झाली. मात्र, झालेल्या प्रकाराची जळगाव शहरातील राजकीय वर्तुळात आणि नागरिकांमध्येही जोरदार चर्चा रंगली आहे.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance