रायझिंग स्टार्स आशिया कप २०२६ मधील बहुचर्चित लढतीत पाकिस्तान ‘अ’ संघाने भारत ‘अ’ संघावर ४८ धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून पाकिस्तानने आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ४९.२ षटकांत ३१३ धावा उभारल्या. त्याला उत्तर देताना भारतीय संघ ४९.१ षटकांत २६५ धावांवर सर्वबाद झाला. भारताचा कर्णधार तिलक वर्मा याने शतक झळकावले, तरी त्याची १४९ चेंडूंत १०० धावांची संथ खेळी संघाला विजयापर्यंत नेऊ शकली नाही. या खेळीचा स्ट्राइक रेट ६७.१ इतका राहिला.
शहबाज बाद झाला तेव्हाच समीकरण बिघडले
सामन्यानंतर तिलक वर्माने सामना भारताच्या हातून कसा निसटला, यावर मोकळेपणाने भाष्य केले. ज्या क्षणी संघाला धावगती वाढवण्याची गरज होती, त्याच क्षणी विकेट पडल्याने संपूर्ण समीकरणच बिघडले, असे त्याने कबूल केले. अभिषेक शर्माने दिलेली सुरुवात आणि त्यानंतर मधल्या फळीत शहबाज अहमदने आपल्यासोबत केलेली भागीदारी निर्णायक होती, असे तिलक म्हणाला. मात्र जेव्हा जलद धावा करण्याची गरज होती, तेव्हाच शहबाज बाद झाला. शहबाज आणखी दोन षटके खेळपट्टीवर राहिला असता, तर आपण सामना भारताच्या बाजूने संपवू शकलो असतो, असे तिलकने सांगितले.
शतकाबद्दल तिलक काय म्हणाला
१४९ चेंडूंत झळकावलेल्या आपल्या झुंजार पण संथ शतकाविषयी विचारले असता, तिलकने ते आपल्या सर्वोत्तम फलंदाजीचे क्षण होते, असे म्हणण्यास नकार दिला. संघ जिंकतो तोच क्षण आपल्यासाठी सर्वोत्तम असतो, असे त्याचे म्हणणे आहे. सामना जिंकला नाही, तर तो क्षण सर्वोत्तम ठरत नाही. आपला नेहमीच डाव शक्य तितका पुढे नेण्याचा प्रयत्न असतो आणि या सामन्यातही तोच प्रयत्न होता, असे त्याने स्पष्ट केले. दुसऱ्या एखाद्या फलंदाजाने साथ दिली असती, तर सामना जिंकता आला असता, असेही तो म्हणाला. कर्णधार म्हणून जबाबदारी आणि दबाव दोन्ही घ्यावे लागतात आणि ते करायला आपल्याला आवडते, असे तिलक वर्माने सांगितले.
Leave a Reply