पुणे शहरात गेल्या चार दिवसांपासून महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून जोरदार कारवाई सुरू आहे. शहरातील विविध भागांमध्ये अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांवर महापालिकेचा हातोडा पडत आहे. आजही अतिक्रमण विभागाची धडक कारवाई सुरूच असल्याचे दिसून येत आहे. आधी डेक्कन, त्यानंतर एफसी रोड, लक्ष्मी रोड आणि त्यानंतर आता या कारवाईचा मोर्चा औंध-बाणेर-बालेवाडी परिसराकडे वळला आहे.
बालेवाडी हाय स्ट्रीट परिसरात अतिक्रमण विभागाकडून कारवाई सुरू असताना मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. या कारवाईदरम्यान काही ठिकाणी दुकानदार आणि महापालिका प्रशासनामध्ये वादाचे प्रसंगही घडत आहेत.
## पुन्हा अतिक्रमण केल्यास दुकान कायमचे सील होणार
पुणे शहरातील अतिक्रमण कारवाईसंदर्भात महापालिका आयुक्त नवल किशोर राम आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. अतिक्रमण कारवाईनंतर पुन्हा व्यवसाय केल्यास दुकानाला कायमस्वरूपी टाळे ठोकणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शिवाय दुकानदारावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. पुणेकरांचे जीवन अधिक सुलभ करण्यासाठी अतिक्रमणविरोधात मोहीम हाती घेण्यात आल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. या मोहिमेत पुणेकरांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी अतिक्रमणाबाबत बोलताना सांगितले की, पुणे शहरात मोठ्या प्रमाणात सर्व ठिकाणी अतिक्रमण काढण्याची सुरुवात केलेली आहे. एकाच दिवसात जवळपास दोन लाख चौरस फुटांमध्ये झालेले अतिक्रमण कमी केले आहे. फ्रंट मार्जिन किंवा साईड मार्जिन या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा खासगी वापर करता येणार नाही. ती जागा जनतेसाठी खुली केली जात आहे, जेणेकरून लोकांना चांगल्या प्रकारे कार्यात्मक सार्वजनिक जागा उपलब्ध होऊ शकेल.
पुढे ते म्हणाले की, काही ठिकाणी असे दिसून आले की फ्रंट मार्जिनवर कारवाई झाली आणि दुसऱ्या दिवशी लोकांनी पुन्हा अतिक्रमण केले. जर फ्रंट मार्जिनवर झालेल्या कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमण केले, तर संबंधित दुकान किंवा व्यावसायिक उपक्रम महापालिकेद्वारे कायमस्वरूपी सील केला जाईल आणि त्यानंतर गुन्हाही दाखल केला जाईल. ही कारवाई पुणेकरांसाठी, जनतेसाठी आहे. लोकांचे जीवन अधिक चांगले आणि सुलभ करण्यासाठी महापालिकेला सहकार्य करावे आणि पुणे शहराला कार्यात्मक सार्वजनिक जागेची गरज आहे, ती उपलब्ध करून देण्यासाठी मदत करावी, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
Leave a Reply