राज्यातील भूदान व ग्रामदानी जमिनींचे बेकायदेशीर हस्तांतरण, भूसंपादन मोबदल्यातील संभाव्य गैरव्यवहार, अवैध खनिज उत्खनन आणि महसूल अभिलेखांतील फेरफार प्रकरणांची उच्चस्तरीय विशेष तपास पथकामार्फत चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेचे आमदार आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. ही मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असून यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना सविस्तर निवेदन दिले आहे.
राज्यात सुमारे अडीच लाख एकर भूदान जमिनींच्या मालकी, व्यवस्थापन आणि हस्तांतरण प्रक्रियेत अनियमितता झाल्याच्या तक्रारी असल्याचे दानवे यांनी निवेदनात नमूद केले आहे. राजकीय हस्तक्षेप, महसूल अधिकाऱ्यांचे संगनमत आणि खासगी व्यावसायिकांच्या हितसंबंधांमुळे भूमिहीन व वंचित घटकांसाठी दान करण्यात आलेल्या जमिनींचा गैरवापर होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
## भिवंडीतील भूसंपादन मोबदल्याचा मुद्दा
भिवंडी तालुक्यातील दिवे-अंजूर व आलिमघर येथील भूदान जमिनींच्या भूसंपादनापोटी ३१ सुधारित नोटिसांद्वारे सुमारे १५१.५० कोटी रुपयांचा मोबदला निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. उर्वरित नोटिसांचा विचार करता ही रक्कम सुमारे ३०० कोटी रुपयांपर्यंत जाते. या मोबदल्याच्या वितरणासंदर्भात महसूल विभागाच्या उपसचिवांनी २५ ऑगस्ट २०२६ रोजी काढलेल्या पत्राचा कायदेशीर आधार तपासण्याची मागणी दानवे यांनी केली आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासकीय निर्णयांची वैधता तपासण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
## कुंडेवहाळ येथील खाणींचा प्रश्न
पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ येथील सुमारे ३९७ एकर भूदान जमिनीवरील ६७ कथित अनधिकृत दगडखाणी व क्रशरचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दगड व मुरूम उत्खनन झाल्याचा आरोप करत खाणपट्ट्यांच्या परवानग्या, पर्यावरणीय मंजुरी, खनिज वाहतूक आणि शासनाला मिळालेला महसूल यांची सखोल चौकशी करावी, असे त्यांनी म्हटले आहे. २०११ पासूनच्या उत्खननाचे आयआयटी किंवा सक्षम तांत्रिक संस्थेमार्फत सॅटेलाइट व व्हॉल्युमेट्रिक सर्वेक्षण करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
कुंडेवहाळ येथील सातबारा उतारे व मूळ महसूल अभिलेखांमध्ये कथित फेरफार करून खासगी व्यक्तींची नावे नोंदविण्यात आल्याचा आरोपही दानवे यांनी केला आहे. यामध्ये संबंधित फेरफार नोंदींची पडताळणी करून दोषी महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी आणि विभागीय कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
भूदान चळवळ ही भूमिहीन आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी उभी राहिलेली ऐतिहासिक चळवळ आहे. या जमिनींचा राजकीय किंवा आर्थिक हितसंबंधांसाठी गैरवापर होत असल्यास तो सहन केला जाणार नाही. शासनाने स्वतंत्र व निष्पक्ष एसआयटी चौकशी जाहीर करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल लेखी स्वरूपात द्यावा. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन आणि न्यायालयीन लढा उभारण्यात येईल, असा इशाराही अंबादास दानवे यांनी दिला आहे.
Leave a Reply