अग्निपथ योजनेअंतर्गत भरती झालेल्या अग्निवीरांना सेवेच्या काळात लग्न करण्याची परवानगी नव्हती. मात्र आता याबाबत सरकारकडे एक नवा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार दुसरा कार्यकाळ स्वीकारणाऱ्या अग्निवीरांना विवाह करण्याची मुभा मिळू शकते. मात्र त्यासाठी एक अटही ठेवण्यात आली आहे.
सुरुवातीला अग्निवीरांचा सेवाकाळ चार वर्षांचा होता. नंतर सरकारने हा कालावधी दोन वर्षांनी वाढवला, त्यामुळे एकूण सेवा सहा वर्षांची झाली. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने दोन वर्षांच्या दुसऱ्या कार्यकाळाला ४ नोव्हेंबर रोजी मंजुरी दिली आहे.
प्रस्तावात नेमकं काय आहे?
चार वर्षांचा पहिला कार्यकाळ पूर्ण करून दोन वर्षांचा दुसरा कार्यकाळ, म्हणजेच सेकंड टूर ऑफ ड्यूटी स्वीकारणाऱ्या अग्निवीरांना लग्न करता येणार आहे. पहिल्या चार वर्षांच्या सेवेदरम्यान मात्र लग्न करण्याची परवानगी नसेल.
दुसऱ्या कार्यकाळासाठी अर्ज करताना अग्निवीर अविवाहित असणे गरजेचे असणार आहे. भरतीच्या वेळीही उमेदवार अविवाहित असणे आवश्यक असते. दुसरा कार्यकाळ सुरू झाल्यानंतर सैनिकांना सुमारे चार आठवड्यांचे संक्षिप्त प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर ते लगेच विवाह करू शकतील.
हा बदल का करण्यात येत आहे?
प्रशिक्षित सैनिकांना अधिक काळ सेवेत टिकवून ठेवणे हा दुसऱ्या कार्यकाळाचा उद्देश आहे. एकूण सहा वर्षांच्या सेवेनंतर उर्वरित ७५ टक्के अग्निवीरांना नियमित भरतीत सामील होण्याची आणखी एक संधी देणे हाही उद्देश आहे.
अग्निवीरांची भरती साधारणपणे साडेसतरा ते एकवीस वर्षे या वयोगटात केली जाते. त्यामुळे पाचव्या वर्षापर्यंत अनेक सैनिक २३ किंवा २४ वर्षांचे झालेले असतात. विवाह आणि कौटुंबिक निर्णय ग्रामीण आणि लहान शहरांतील तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. हा वैयक्तिक आणि सामाजिक पैलू लक्षात घेऊनच दुसऱ्या कार्यकाळात विवाहाला परवानगी देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.
संरक्षण प्रमुख जनरल एन. एस. राजा सुब्रमणी यांनी मंत्रिमंडळाच्या मंजुरीवेळी सांगितले की, गरजेनुसार या योजनेत बदल होत राहतील. प्रशिक्षित सैनिकांच्या अनुभवाचा अधिक काळ उपयोग करणे आणि अग्निवीरांच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करणे, हा सरकारचा उद्देश आहे.
Leave a Reply