सोमवार, २३ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

नांदूर मधमेश्वर कालव्याचे आवर्तन सुरू; १०२ गावांना दिलासा

वैजापूर, गंगापूर आणि कोपरगावमधील १०२ गावांतील रब्बी पिकांसाठी नांदूर मधमेश्वर कालव्याचे आवर्तन शुक्रवारी सुरू झाले. ३०० क्युसेक्स वेगाने पाणी सोडले आहे.

नांदूर मधमेश्वर कालव्याचे आवर्तन सुरू; १०२ गावांना दिलासा

खरीप हंगामातील पिके दुष्काळामुळे हातची गेल्यानंतर रब्बी हंगाम तरी वाचावा, या आशेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. नांदूर मधमेश्वर कालव्याचे आवर्तन शुक्रवारी रात्री सुरू झाले असून, सुरुवातीला ३०० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. या आवर्तनातून दीड टीएमसी पाणी मिळणार असून सुमारे तीन आठवडे पाणी सुरू राहणार आहे. त्यामुळे वैजापूर, गंगापूर आणि कोपरगाव तालुक्यांतील १०२ गावांमधील रब्बी पिकांना जीवनदान मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

यंदा पावसाच्या लहरीपणामुळे तीनही तालुक्यांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. खरीप पिके वाया गेल्यानंतर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी केली होती. मात्र विहिरी आणि बोअरवेलमधील भूजल पातळी खालावल्याने सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला होता. अशा परिस्थितीत नांदूर मधमेश्वर कालव्याचे आवर्तन शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले होते. धरणातील पाणीपातळी अपेक्षित स्तरावर येत नसल्याने आवर्तन सुरू होण्यास विलंब झाला होता. पाणीपातळी आवश्यक स्तरावर आल्यानंतर शुक्रवारी रात्री कालव्यात पाणी सोडण्यात आले.

कालव्याच्या लाभक्षेत्रात वैजापूर तालुक्यातील ४९, गंगापूर तालुक्यातील ४६ आणि कोपरगाव तालुक्यातील ७ अशा एकूण १०२ गावांचा समावेश आहे. सुमारे १२८ किलोमीटर लांबीच्या कालव्याच्या माध्यमातून ४३ हजार ५६० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. ४९ पोटचाऱ्यांद्वारे पाणीवाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. उभ्या पिकांसह भूजल पुनर्भरणालाही या आवर्तनाचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

शेतकऱ्यांच्या संघर्षानंतर आवर्तनाचा निर्णय

हक्काच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी यंदा मोठा संघर्ष उभारला होता. ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यात जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन आणि आमरण उपोषण करण्यात आले. मागणीला प्रतिसाद मिळत नसल्याने ३१ ऑक्टोबर रोजी जांबरगाव परिसरात महिलांसह शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गावर धडक देत सुमारे तीन तास वाहतूक रोखली होती. पाणी सोडल्याशिवाय माघार घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली होती. त्यानंतर २ नोव्हेंबर रोजी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आवर्तनाबाबत निर्णय झाला.

पाणीवाटपावर प्रशासनाचा पहारा

पाणीवाटप पायथा ते माथा या पद्धतीने होणार आहे. सर्वप्रथम गंगापूर, त्यानंतर वैजापूर आणि सर्वात शेवटी कोपरगाव तालुक्याला पाणी मिळणार आहे. पाणीकटपादरम्यान अनधिकृत उपसा, कालव्याच्या दरवाजामध्ये हस्तक्षेप आणि पाण्यावरून शेतकऱ्यांमध्ये वाद होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. आवर्तन सुरळीत पार पडावे आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस संरक्षणाचे नियोजन करण्यात आले आहे. कार्यकारी अभियंता प्रवीण पाबळे यांनी सांगितले की, २० नोव्हेंबर रोजी आवर्तन सोडण्यात आले असून पायथा ते माथा नियमानुसार पाणीवाटप होईल आणि साधारण तीन आठवडे आवर्तन सुरू राहण्याची शक्यता आहे.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance