सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीनंतर जावळीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मतदानाच्या आकड्यांवरून सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांना आता महायुतीतील अंतर्गत राजकारणाची किनार मिळाली आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना जागावाटपात दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच नाराजीचा फटका मतदानातून दिसून आला, असा थेट आरोप प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांनी केला आहे. शेखर पाटोळेंच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी चांगलाच समाचार घेतला.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर सुरू झालेला राजकीय कलगीतुरा आता अधिकच रंगू लागला आहे. अर्जुन काळे यांना जावळी मतदारसंघातून अपेक्षित मतदान का मिळाले नाही, यावरून शेखर पाटोळे यांनी शिवेंद्रराजे गटाला आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला होता. मात्र जावळीतील मतदानामागची पार्श्वभूमी समजून न घेता दुसऱ्यांवर आरोप करणे म्हणजे स्वतःच्या राजकीय अपयशावर पडदा टाकण्याचा प्रयत्न असल्याचा पलटवार सौरभ शिंदे यांनी केला आहे.
जागावाटपात बाबाराजेंना दुय्यम स्थान दिल्याचा आरोप
सौरभ शिंदे म्हणाले की, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत जावळीत उमटलेला मतदानाचा कौल हा केवळ आकड्यांचा खेळ नसून महायुतीतील वरिष्ठ पातळीवर झालेल्या राजकीय कुरघोड्यांविरोधात कार्यकर्त्यांच्या मनात साचलेल्या असंतोषाचा उद्रेक आहे. जागावाटपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून घेतलेल्या भूमिकेमुळे बाबाराजेंना दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न झाला. महायुतीच्या अंतर्गत राजकारणात त्यांना डॉमिनेट करण्याच्या हालचाली झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती.
ही नाराजी बाबाराजेंच्या कानावरही घालण्यात आली होती. मात्र मुख्यमंत्र्यांचा शब्द आणि महायुतीतील समन्वयाला सर्वोच्च प्राधान्य देत बाबाराजेंनी स्वतःच्या राजकीय ताकदीचा विचार न करता उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली. तरीही मतदारांच्या मनातील नाराजी मतपेटीतून बाहेर आली. त्यामुळे जावळीतील मतदानाचे खापर स्थानिक नेतृत्वावर फोडण्यापेक्षा महायुतीतील वरिष्ठांच्या अंतर्गत कुरघोड्यांचा आधी हिशेब द्यावा, अशा शब्दांत शिंदे यांनी शेखर पाटोळे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे जावळी-सातारा मध्ये ४५० मतांची ताकद असूनही त्यांनी माघार घेण्याचा मोठेपणा दाखवला; हा कमकुवतपणा नव्हे, मनाचा मोठेपणा असल्याचेही सौरभ शिंदे यांनी नमूद केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, जावळी-सातारा मध्ये सुमारे ४५० मतांची ताकद असतानाही बाबाराजेंनी महायुतीतील समन्वय बिघडू नये, यासाठी माघार घेतली. केवळ मुख्यमंत्र्यांच्या शब्दाचा मान राखण्यासाठी आणि युतीतील एकजूट टिकवण्यासाठी त्यांनी आपल्या समर्थकांची समजूत काढली. अर्जुन काळे यांच्या उमेदवारीला प्रामाणिकपणे सहकार्य करण्याची भूमिका घेतली आणि त्यानुसार कार्यकर्त्यांनी कामही केले. मात्र मतदारांच्या मनात असलेली नाराजी मतपेटीतून व्यक्त झाली. याचा अर्थ बाबाराजेंनी विरोधी भूमिका घेतली, असा काढणे म्हणजे वस्तुस्थितीपासून पळ काढण्यासारखे असल्याचे शिंदे यांनी म्हटले.
शिवेंद्रसिंहराजेंवर बोलण्याआधी हिशेब द्या, असा इशारा
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर टीका करण्याच्या आधी महायुतीतील कुरघोड्यांचा हिशेब द्यावा, असा इशाराही सौरभ शिंदे यांनी दिला. जागावाटपात बाबाराजेंना दुय्यम स्थान मिळेल, अशी परिस्थिती निर्माण करणाऱ्या आणि त्यांच्या राजकीय ताकदीला कमी लेखण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्याच राजकारणाचा परिणाम मतदानातून दिसून आला, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे जावळीतील मतांचा हिशेब मागण्यापूर्वी महायुतीतील वरिष्ठ पातळीवर नेमके काय राजकारण झाले, याचे आत्मपरीक्षण शेखर पाटोळे यांनी करावे, अशी मागणी शिंदे यांनी केली. बाबाराजेंनी युतीचा शब्द पाळला आणि संयम दाखवला; पण कार्यकर्त्यांच्या मनातील नाराजी दडपून ठेवता येत नाही, हे या निकालाने दाखवून दिल्याचेही ते म्हणाले.
जयकुमार गोरेंच्या राजकीय संघर्षाबद्दल आपल्याला कोणताही आक्षेप नसल्याचे सांगत शिंदे म्हणाले की, संघर्षाची मक्तेदारी कोणाकडेही नाही. जावळीनेही अनेक राजकीय संघर्ष पाहिले आहेत आणि प्रसंगी मोठमोठ्या राजकीय शक्तींना आपली ताकद दाखवून दिली आहे. बाबाराजेंच्या पाठिंब्यामुळे राजकीय मैदानात उतरलेल्या लोकांनी आज त्याच जावळीला आत्मपरीक्षणाचे धडे देणे हास्यास्पद आहे. बाबाराजेंच्या मनाचा मोठेपणा म्हणजे त्यांची राजकीय ताकद कमी झाली, असा गैरसमज कोणी करून घेऊ नये, असेही त्यांनी नमूद केले. एकूणच, जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर जावळीतील राजकारण आता नव्या वळणावर आले असून महायुतीतील नेत्यांमधील नाराजी उघडपणे समोर येत असल्याचे चित्र आहे.
Leave a Reply