नोकरी करत असताना दर महिन्याला कर्मचाऱ्याच्या पगारातील काही रक्कम प्रोव्हिडंट फंड खात्यात जमा केली जाते. कर्मचारी आणि कंपनी दोघांचेही या खात्यात योगदान असते. ही रक्कम भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी जमा केली जाते. मात्र घर खरेदी, वैद्यकीय उपचार, मुलांचे शिक्षण, लग्न किंवा नोकरी सुटल्यानंतर आर्थिक गरज असेल तर कर्मचारी पीएफमधील पैसे काढू शकतात.
पीएफ काढण्यासाठी काय आवश्यक?
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने पीएफ काढण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आता कार्यालयात जाण्याची गरज नाही; घरबसल्या ऑनलाइन क्लेम करता येतो. ऑनलाइन क्लेम करण्यापूर्वी काही गोष्टी पूर्ण असणे आवश्यक आहे. तुमचा यूएएन सक्रिय असायला हवा, यूएएनसोबत आधार कार्ड जोडलेले असायला हवे, बँक खाते आणि आयएफएससी कोडची माहिती अद्ययावत असायला हवी, आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांक सुरू असायला हवा आणि पीएफ खात्याचे केवायसी पूर्ण झालेले असायला हवे.
ऑनलाइन क्लेम कसा करायचा?
सर्वप्रथम ईपीएफओच्या अधिकृत मेंबर पोर्टलवर जा. तुमचा यूएएन, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉगिन करा. त्यानंतर ‘ऑनलाइन सर्व्हिसेस’ या पर्यायावर क्लिक करा आणि ‘क्लेम (फॉर्म-३१, १९, १०सी आणि १०डी)’ हा पर्याय निवडा. स्क्रीनवर तुमच्या बँक खात्याचे तपशील दिसतील; ते तपासून व्हेरिफाय करा. त्यानंतर ‘प्रोसीड फॉर ऑनलाइन क्लेम’ या पर्यायावर क्लिक करा. आता तुम्हाला कोणत्या प्रकारचा क्लेम करायचा आहे, ते निवडा. आवश्यक माहिती भरा आणि संबंधित कागदपत्रे अपलोड करा. सर्व माहिती तपासल्यानंतर आधारशी जोडलेल्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाका आणि अर्ज सबमिट करा.
Leave a Reply