देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. कंपनीने रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ रोजी निवडक कार मॉडेल्सच्या किंमतीत वाढ केली आहे. नवीन दर त्याच दिवसापासून लागू झाले आहेत. नवीन कार खरेदीची तयारी करणाऱ्यांना आता पूर्वीपेक्षा जास्त रक्कम मोजावी लागणार आहे.
सरासरी ०.३१ टक्के वाढ, तपशील अद्याप जाहीर नाही
कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार वाढत्या इनपुट कॉस्टमुळे निवडक मॉडेल्सच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. किंमतीत सरासरी ०.३१ टक्के वाढ करण्यात आली आहे. ही वाढ वॉल्युम-वेटेड एव्हरेज पद्धतीने करण्यात आली आहे, म्हणजे वेगवेगळ्या मॉडेल्सच्या विक्रीच्या हिशेबाने सरासरी वाढ काढण्यात आली आहे. खर्च कमी करण्यासाठी सातत्याने उपाययोजना केल्या जात असल्या तरी वाढीव खर्चाचा काही भार ग्राहकांवर टाकण्यात आला आहे, असे कंपनीने म्हटले आहे. मात्र दरवाढीचा ग्राहकांवरील परिणाम कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. सध्या सर्व मॉडेल्सच्या नव्या किमतींचा तपशील जाहीर करण्यात आलेला नाही.
सहा महिन्यांत चौथ्यांदा दरवाढ
चालू आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या सहामाहीत कंपनीने आधीच तीन वेळा दरवाढ केली होती. या तिन्ही दरवाढी मिळून कारच्या किमतींमध्ये एकूण १ टक्क्यांहून अधिक वाढ झाली होती. आता नोव्हेंबरमधील नव्या दरवाढीमुळे निवडक कारसाठी ग्राहकांना आणखी जास्त पैसे मोजावे लागतील. विशेष म्हणजे, कंपनीच्या वाहन विक्रीत मोठी वाढ होऊनही नफ्यावर दबाव कायम आहे. आर्थिक वर्ष २०२७ च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक तुलनेत २६.३६ टक्क्यांनी घसरून २,४६६.१ कोटी रुपयांवर गेला आहे. याच कालावधीत कंपनीने विक्रमी तिमाही विक्री आणि महसुलात मोठी वाढ नोंदवली आहे. कच्च्या मालाच्या वाढत्या किमती आणि पश्चिम आशियातील संघर्षामुळे इनपुट कॉस्ट वाढली असून त्याचा परिणाम नफ्यावर झाला आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचे ऑपरेटिंग ईबीआयटीडीए मार्जिन घटून ९.४ टक्के राहिले, गेल्या वर्षी याच काळात ते १२.७ टक्के होते. खर्चावर नियंत्रणासाठी कंपनीने मार्केटिंग खर्चातही कपात केली होती, तरी खर्चाचा दबाव कमी झालेला नाही. दुसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर कंपनीने आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत गरजेनुसार किमतींमध्ये बदल केला जाऊ शकतो, असे संकेत दिले होते. आता कंपनीने त्या दिशेने पाऊल उचलत निवडक मॉडेल्स महाग केली आहेत.
Leave a Reply