मराठी रंगभूमीला अधिक व्यापक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मुंबईतील नेहरू सेंटरने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. व्यावसायिक आणि प्रायोगिक अशा दोन्ही प्रकारच्या मराठी नाटकांना मुंबईतील नामांकित सांस्कृतिक केंद्र असलेल्या नेहरू सेंटरमध्ये सादरीकरणाची संधी मिळावी, या उद्देशाने हा विशेष उपक्रम सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत रविवारच्या नाट्यप्रयोगांसाठी मराठी नाट्यनिर्मात्यांना सवलतीच्या दरात नेहरू सेंटरचे नाट्यगृह उपलब्ध करून दिले जाणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद या उपक्रमात नेहरू सेंटर व्यवस्थापनाला सहकार्य करणार आहे.
रविवारी दुपारी साडेतीन वाजता प्रयोग
या उपक्रमाची सुरुवात दर रविवारी दुपारी ३.३० वाजता मराठी नाटकांचे प्रयोग आयोजित करण्यापासून झाली आहे. सुरुवातीला केवळ रविवार दुपारच्या प्रयोगांवर भर दिला जाणार असून, मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन आठवड्यातील इतर दिवशीही नाटकांचे प्रयोग आयोजित करण्याचा विचार आहे. आगामी प्रयोगांचे वेळापत्रकही निश्चित करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत ‘ही दोस्ती तुटायची नाही’ या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. आगामी काळात ‘पुढच्या शुक्रवारी सात वाजता’, ‘भूमिका’, ‘जर तरची गोष्ट’, ‘काटकोन त्रिकोण’, ‘आमने सामने’ आणि ‘मराठी बाणा’ यांसारख्या नाटकांचे प्रयोग नेहरू सेंटरमध्ये रंगणार आहेत.
नाट्यनिर्मात्यांना दिलासा, प्रेक्षकांना मेजवानी
मराठी नाट्यनिर्मात्यांसाठी रविवारचा दिवस नेहमीच महत्त्वाचा असतो. मात्र, या दिवशी नाट्यगृह उपलब्ध होणे अनेकदा कठीण जाते. ही अडचण लक्षात घेऊन नेहरू सेंटर व्यवस्थापनाने मराठी नाट्यनिर्मात्यांसाठी नाट्यगृह सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमात व्यावसायिक आणि प्रायोगिक अशा दोन्ही प्रकारच्या नाटकांचा समावेश असेल. केवळ लोकप्रिय व्यावसायिक नाटकांपुरते मर्यादित न राहता, आशयघन आणि वेगळे प्रयोग करणाऱ्या नाटकांनाही प्रोत्साहन दिले जाणार आहे.
नेहरू सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन करीर यांनी सांगितले की, नेहरू सेंटरमध्ये आजवर मराठी, हिंदी आणि इंग्रजीसह विविध भाषांतील सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाट्यप्रयोग होत आले आहेत. हिंदी आणि गुजराती नाटकांचे प्रयोगही इथे नियमितपणे सादर होतात. मात्र, मराठी नाटकांनाही या प्रतिष्ठित व्यासपीठावर अधिकाधिक संधी मिळावी, अशी व्यवस्थापनाची इच्छा आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे यांनीही या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. नाट्यप्रयोगांबरोबरच ‘आविष्कार’ संस्थेसोबत सहकार्य करून नाट्यवाचन, कार्यशाळा आणि विविध सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्याचे नियोजन आहे. इतर भारतीय भाषांमधील नाटकांचाही समावेश व्हावा, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
Leave a Reply