तुमची कार किंवा दुचाकी प्रदूषण नियंत्रण चाचणीत नापास झाली आहे का? यामागे इंजिनमधील बिघाड, खराब झालेला एअर फिल्टर किंवा भेसळयुक्त इंधन ही कारणं असू शकतात. मात्र घाबरण्याचं कारण नाही. काही सोप्या पायऱ्या पार पाडल्यास वाहन पुन्हा चाचणीत उत्तीर्ण होऊ शकतं.
सगळ्यात आधी अहवाल तपासा
गाडी प्रदूषण चाचणीत नापास झाल्यास सगळ्यात आधी चाचणीचा अहवाल नीट तपासा. वाहनातून कार्बन मोनोऑक्साइड किंवा हायड्रोकार्बन यांसारखे वायू किती प्रमाणात बाहेर पडत आहेत, याची माहिती अहवालात मिळते. हा अहवाल मेकॅनिकला दाखवा, जेणेकरून नेमकी समस्या समजू शकेल.
सर्व्हिसिंग आणि दुरुस्ती
गाडीची सर्व्हिसिंग बऱ्याच दिवसांपासून झाली नसेल, तर ती अधिकृत किंवा विश्वासार्ह सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन जा. इंजिन ऑइल आणि ऑइल फिल्टर तपासून घ्या. गरज असल्यास ते बदलून घ्या. वेळेवर सर्व्हिसिंग केल्यामुळे इंजिनची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते.
एअर फिल्टरमध्ये धूळ आणि घाण जमा झाल्यास इंजिनला पुरेशा प्रमाणात हवा मिळत नाही. त्यामुळे इंधनाचं ज्वलन योग्य प्रकारे होत नाही आणि प्रदूषण वाढू शकतं. म्हणून एअर फिल्टर स्वच्छ करा किंवा गरज असल्यास बदला. पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनातील स्पार्क प्लग खराब असल्यास तेही बदलून घ्या.
फ्युएल इंजेक्टरमध्ये घाण जमा झाल्यास इंजिनला योग्य प्रमाणात इंधन मिळत नाही. त्यामुळे वाहनाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. मेकॅनिककडून फ्युएल इंजेक्टर आणि थ्रॉटल बॉडी तपासून घ्या. यासोबतच सायलेन्सर आणि कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमध्ये गळती किंवा अडथळा आहे का, हेही तपासणं महत्त्वाचं आहे.
इंधनाची गुणवत्ता आणि पुन्हा चाचणी
निकृष्ट किंवा भेसळयुक्त पेट्रोल-डिझेलमुळे इंजिनच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नेहमी विश्वासार्ह पेट्रोल पंपावरूनच इंधन भरावं. योग्य दर्जाचं इंधन वापरल्यास इंजिनचं कार्य सुरळीत राहण्यास मदत होते.
वाहनातील आवश्यक दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग पूर्ण झाल्यानंतर गाडी काही किलोमीटर चालवा. यामुळे इंजिन सामान्य कार्यरत तापमानापर्यंत गरम होईल. त्यानंतर अधिकृत पीयूसी सेंटरमध्ये पुन्हा प्रदूषण चाचणी करून घ्या. वाहनाचं उत्सर्जन निर्धारित मर्यादेत असल्यास तुम्हाला पीयूसी प्रमाणपत्र मिळू शकतं.
Leave a Reply