संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडले जाण्याची शक्यता आहे. विधेयक आल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करू, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. सुळे यांची भूमिका स्वागतार्ह असल्याचे तटकरे म्हणाले.
समान जागावाढीला पाठिंबा
सुळे यांनी विधेयक आल्यानंतर भूमिका स्पष्ट करण्याचे सांगितले असून समान जागा वाढल्यास त्याला आपला पाठिंबा असेल, असेही त्यांनी म्हटले आहे. लोकशाहीच्या महत्त्वाच्या गाभ्याच्या अनुषंगाने त्यांचे हे वक्तव्य स्वागतार्ह असल्याचे तटकरे म्हणाले. डिलिमिटेशन विधेयकावरून खासदार फुटीच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. शरद पवार यांचे खासदार कुठे जातील, याबाबतची वक्तव्ये दुर्दैवी आणि कपोलकल्पित असल्याचे तटकरे म्हणाले.
खासदार फुटीच्या चर्चेवर प्रतिक्रिया
खासदार फोडण्यासाठी १५० कोटींचा आकडा ठरल्याच्या दाव्यावरही तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. आपले अपयश झाकण्यासाठी दुसऱ्यांना दोष दिला जातो, असे म्हणत त्यांनी हे वक्तव्य वैफल्यातून आल्याचे सांगितले. आपले खासदार किती फुटले आणि बाजूला का गेले, याचे आत्मचिंतन करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
आनंदराज आंबेडकर यांच्या विधानावरही तटकरे बोलले. ते वक्तव्य अत्यंत निषेधार्ह असून त्याचा जाहीर शब्दांत धिक्कार करतो, असे तटकरे म्हणाले. लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, मात्र अजित पवार यांचे महाराष्ट्रासाठी योगदान आहे आणि त्यांच्या निधनाने देश हळहळला, असे असताना केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले. आनंदराज आंबेडकर महायुतीतील घटक असले तरी त्यांचे वक्तव्य अयोग्य असल्याचे तटकरे म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी शरद पवार गटाच्या आमदाराची भेट घेतल्याच्या मुद्द्यावर तटकरे म्हणाले, शिंदे हे राज्याचे नेते आणि उपमुख्यमंत्री आहेत. दौऱ्यावर असताना कोणीही त्यांना भेटू शकते. लोक विकासाची कामे सांगण्यासाठी भेटतात, मात्र याचा राजकीय अर्थ काढणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले.
Leave a Reply