भारतातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय असलेला पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. त्याच्या गाण्यांमधील मद्यपान आणि नशेशी संबंधित शब्दांवर घेतल्या जाणाऱ्या आक्षेपांमुळे दिलजीतने जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या कॉन्सर्टदरम्यान त्याने कोणाचेही नाव न घेता टीकाकारांना प्रत्युत्तर दिले. यावेळी त्याने परदेशी कलाकारांच्या गाण्यांचा दाखला देत भारतीय कलाकारांसाठी वेगळे नियम का, असा सवाल उपस्थित केला.
कोल्डप्लेचे उदाहरण दिले
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर परफॉर्म करणे हे आपले स्वप्न असल्याचे दिलजीतने सांगितले. यावेळी त्याने गेल्या वर्षी याच स्टेडियमवर झालेल्या ब्रिटिश रॉक बँड कोल्डप्लेच्या कॉन्सर्टची आठवण केली. कोल्डप्लेच्या गाण्यांमध्ये मद्यपान आणि नशेशी संबंधित उल्लेख असतानाही त्यांच्यावर आक्षेप घेतला जात नाही, असे तो म्हणाला. मात्र, भारतीय कलाकाराने अशी गाणी गायली की लगेच प्रश्न उपस्थित केले जातात, असे त्याने नमूद केले.
कोल्डप्ले येथे येऊन फिलिंग ड्रंक अँड हाय ही गाणी गातात, तेव्हा कोणालाही अडचण नसते. मलाही ते गाणे आवडते. पण जेव्हा दिलजीत तेच गातो, तेव्हा लोकांना त्रास होतो, अशा शब्दांत त्याने आपली नाराजी व्यक्त केली.
माझा जन्म भारतातच झाला आहे
पुढे दिलजीत म्हणाला की, लोक म्हणतात मी परदेशातून आलो आहे, पण माझा जन्म भारतातच झाला आहे, होनोलुलुमध्ये नाही. माझ्या बँडमधील सदस्यही भारतीय असून त्यांचा जन्म भारतातच झाला आहे, असे त्याने स्पष्ट केले. जगभरात पंजाबी संगीताचा प्रसार करण्यासाठी मी प्रयत्न करत आहे, असे तो म्हणाला. कलाकाराच्या स्वातंत्र्यावर निर्बंध आणणे चुकीचे आहे, असे त्याचे म्हणणे आहे. माझे उद्देश काम करणे, कर भरणे आणि भारतीय संगीताला जागतिक स्तरावर पोहोचवणे हा आहे, असे त्याने सांगितले.
चार गाण्यांवर आक्षेप; काय आहे प्रकरण?
दरम्यान, दिलजीतच्या कॉन्सर्टपूर्वी चंदीगडमधील पीजीजीसी-४६ कॉलेजचे सहयोगी प्राध्यापक डॉ. पंडित राव धरेनवर यांनी त्याच्या चार गाण्यांवर आक्षेप घेतला होता. पटियाला पेग, पंज तारा, जे बिछो फीम लब्बिया आणि जट्ट उत्ते फायर करदा ही गाणी सादर करू नयेत, अशी मागणी त्यांनी केली होती. या गाण्यांमधून मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन आणि हिंसाचाराला प्रोत्साहन मिळू शकते, असा त्यांचा दावा आहे.
Leave a Reply