रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

रेल्वे तिकीटावर आता ४५ पैशांत १० लाखांचे विमा कवच

रेल्वे स्थानकावरील आरक्षित काऊंटरवरून तिकीट घेणाऱ्या प्रवाशांनाही आता विमा सुविधा मिळणार आहे. मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास १० लाख रुपयांपर्यंतचे कवच मिळेल.

रेल्वे तिकीटावर आता ४५ पैशांत १० लाखांचे विमा कवच

रेल्वे प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. रेल्वेने एक धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्यानुसार, रेल्वे स्थानकांवरील आरक्षित काऊंटरवरून तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशांना प्रवासी विम्याची सुविधा सुरू झाली आहे. गेल्या महिन्यापासून ही सुविधा उपलब्ध झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात याविषयी निर्देश दिले होते. त्यामुळे ऑनलाईन तिकीट काढणाऱ्या प्रवाशांप्रमाणेच ऑफलाईन तिकीट काढणाऱ्या प्रवाशांनाही विमा सुरक्षेच्या कक्षेत आणण्यात आले आहे.

अवघ्या ४५ पैशांत १० लाखांची सुविधा

आयआरसीटीसीच्या नियमाप्रमाणे संकेतस्थळावरून अथवा मोबाईल प्लॅटफॉर्मवरून ऑनलाईन तिकीट बुक करताना प्रवाशांना ऐच्छिक विम्याचा पर्याय उपलब्ध होता. पण थेट रेल्वे स्थानकावरील काऊंटरवरून तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशांना ही सुविधा उपलब्ध नव्हती. जे प्रवासी डिजिटल तिकीट बुक करू शकत नव्हते अथवा जे प्रामुख्याने काऊंटरवरूनच तिकीट काढतात, त्यांना विमा संरक्षणापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी आता हा निर्णय घेण्यात आला आहे.

ऑनलाईन बुकिंगच्या धरतीवर ऑफलाईन तिकिटावर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार, मृत्यू अथवा कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या प्रवाशांना १० लाख रुपयांपर्यंतचे विमा कव्हरेज मिळते. सध्या ऑनलाईन विम्याचा दर ४५ पैसे इतका आहे. काऊंटरवरील दरातही फार मोठा बदल होणार नसल्याची चर्चा आहे. रेल्वे स्थानकाच्या तिकीट काऊंटरवर यासंबंधीची माहिती प्रवासी घेऊ शकतील.

सर्वोच्च न्यायालयाने अन्याय दूर केला

जून २०२३ मध्ये ओडिशात रेल्वे अपघात झाला होता. त्यानंतर रेल्वे सुरक्षेशी संबंधित याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्लाह आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने ६ ऑक्टोबर रोजी ऑनलाईनप्रमाणेच ऑफलाईन तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना विमा कवच देण्यासंबंधीचे निर्देश दिले होते. आश्वासनानंतरही ऑफलाईन, काऊंटरवर जाऊन विमा कवच न दिल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. त्याचवेळी न्यायालयाने २७ ऑक्टोबरपर्यंत ही सुविधा लागू करण्याची मुदत दिली होती. तसेच रेल्वे बोर्डाला खडसावलेही होते.

आता ऑनलाईनप्रमाणेच ऑफलाईन प्रवाशांना विम्याची सुविधा मिळाल्याने सेवेतील आणि सुरक्षिततेतील तफावत दूर झाली आहे. अर्थात ही सुविधा ऐच्छिक आहे. प्रवासी तिकीट काऊंटरवर याविषयीची विचारपूस करू शकतात.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance