हिवाळा सुरू झाला की बाजारात लालचुटूक आणि ताजी गाजरे मोठ्या प्रमाणात मिळू लागतात. या गाजरांपासून बनवलेला गरमागरम गाजराचा हलवा खाण्याची मजाच काही और असते. हा हलवा घरीच सोप्या पद्धतीने कसा बनवायचा, ते जाणून घेऊया.
लागणारे साहित्य
गाजराचा हलवा बनवण्यासाठी सर्वप्रथम लाल गाजरे, दूध, साखर, तूप, खवा, वेलची पूड, काजू, बदाम आणि मनुका हे साहित्य लागते.
बनवण्याची पद्धत
सर्वप्रथम गाजरे स्वच्छ धुऊन त्यांची साल काढा. त्यानंतर किसणीच्या मदतीने गाजरांचा बारीक कीस करून घ्या. एका जाड बुडाच्या कढईत थोडे तूप गरम करा. त्यात गाजराचा कीस घालून ५ ते ७ मिनिटे मंद आचेवर परतून घ्या. यामुळे हलव्याला छान सुगंध येतो.
आता कढईत दूध घाला आणि गाजरांचा कीस चांगला हलवून घ्या. मध्यम आचेवर दूध आटेपर्यंत मिश्रण शिजू द्या. अधूनमधून ढवळत राहा, जेणेकरून मिश्रण कढईला लागणार नाही. दूध आटल्यानंतर त्यात साखर घाला. साखर घातल्यावर मिश्रण थोडे पातळ होईल. पुन्हा हलवत राहून त्यातील अतिरिक्त ओलावा आटवून घ्या. त्यानंतर थोडा खवा टाका.
आता उरलेले तूप, चिरलेले काजू-बदाम आणि मनुका घालून हलवा. मिश्रण घट्ट होऊन कढईच्या बाजू सोडू लागले की त्यात वेलची पूड मिसळा. तयार झालेला गाजराचा हलवा एका बाऊलमध्ये काढा. वरून थोडे काजू-बदाम घालून सजवा. गरमागरम किंवा थंड करूनही हा हलवा खायला अतिशय स्वादिष्ट लागतो.
Leave a Reply