धाराशिवच्या येडोलामधील साठवण तलाव पूर्णपणे कोरडा पडल्याने बळीराजाच्या काळजाचा ठोका चुकला आहे. पाण्याअभावी तलावाच्या तळाला पडलेल्या भेगा म्हणजे शेतकऱ्यांच्या आयुष्याला पडलेल्या चिराच जणू. पावसाळा सरून अवघे काही महिने उलटले असतानाच नोव्हेंबरमध्ये ही काळीज पिळवटून टाकणारी वेळ यावी, याहून मोठे दुःख काय असणार, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.
तलावाची अवस्था भयावह
धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग परिसरात असलेल्या येडोला साठवण तलावाची पाणीपातळी पूर्णपणे खालावली असून तलाव कोरडा पडल्याचे भयावह चित्र दिसत आहे. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच नोव्हेंबर महिन्यात ही स्थिती निर्माण झाल्याने आगामी काळात पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. येडोला साठवण तलावाची पाणी साठवण्याची क्षमता एक दशलक्ष लिटर इतकी असून, या तलावातून साधारणतः ३०० एकर क्षेत्राला पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सध्या तलावातील मातीला भेगा पडल्या असून पाण्याचा शेवटचा थेंबही सुकताना दिसत आहे. सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, तलावात उरलेले थोडेफार पाणी मिळावे यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी खड्डा खणला होता, परंतु आता त्या खड्ड्यातील पाणीही पूर्णपणे आटले आहे.
स्थलांतराची भीती, तातडीच्या उपायांची गरज
नोव्हेंबरमध्येच तलावाने तळ गाठल्यामुळे मे, जून आणि जुलैपर्यंत हीच परिस्थिती कायम राहिल्यास शेतकऱ्यांसमोर रोजगारासाठी शहराकडे स्थलांतर करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आणि सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
Leave a Reply