राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने सत्ताधारी भाजपवर निर्णायक आघाडी घेत विजय मिळवला. राज्य निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, ३७ जिल्ह्यांतील ७,५४३ पंचायत समिती जागांपैकी ७,३९३ जागांचे आणि १,२७५ जिल्हा परिषद जागांपैकी ९८१ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. पंचायत समितीत काँग्रेसने ३,७०१ जागा जिंकल्या, तर भाजपला २,१८१ जागांवर समाधान मानावे लागले. जिल्हा परिषदेत काँग्रेसने ५९९ जागा जिंकल्या, तर भाजपला ३०१ जागा मिळाल्या. या निकालांमुळे ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत झाल्याचे दिसून येत आहे.
राहुल गांधींची प्रतिक्रिया
या विजयानंतर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून मतदारांचे आभार मानले. ग्रामीण राजस्थानमधील जनतेने काँग्रेसवर दाखवलेला विश्वास आता आपली जबाबदारी आहे, असे त्यांनी म्हटले. भाजपचे स्वतःचे सरकार असलेल्या राज्यातून आलेला हा प्रतिसाद ‘डबल इंजिन’ला थेट दिलेले उत्तर असल्याचे त्यांनी नमूद केले. भाजपने मनरेगावर हल्ला केला, शेतकऱ्यांना तोट्यात ढकलले आणि पंचायतींचे अधिकार काढून घेतले, असा आरोप त्यांनी केला. महागाई, बेरोजगारी आणि स्थलांतरामुळे गावे ओसाड पडली होती; गावांनी सर्व काही पाहिले, सहन केले आणि आता आपला आवाज उठवला आहे, असे गांधी म्हणाले. हा केवळ राजस्थानचा कौल नसून देशातील प्रत्येक गावाचा आवाज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
राजस्थान काँग्रेसनेही पोस्ट करून पंचायती राज निवडणुकांमध्ये काँग्रेसने झेंडा रोवला असून जनतेने स्पष्ट बहुमताने दणदणीत विजय दिल्याचे म्हटले आहे. भाजपच्या भ्रष्टाचार आणि अराजकतेला कंटाळलेल्या जनतेच्या संतापाचा हा पुरावा असल्याचे प्रदेश काँग्रेसने म्हटले आहे.
प्रमुख जिल्ह्यांतील चित्र
अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये काँग्रेसने भाजपवर मोठी आघाडी घेतली. जयपूरमध्ये काँग्रेसने २१६ पंचायत समिती जागा जिंकल्या, तर भाजपला केवळ ८७ जागा मिळाल्या. जोधपूरमध्ये काँग्रेसला १९५ आणि भाजपला ८१ जागा मिळाल्या. भीलवाड्यात काँग्रेस १६५ विरुद्ध भाजप १११, बिकानेरमध्ये काँग्रेस १५५ विरुद्ध भाजप ६५, दौसामध्ये काँग्रेस १३५ विरुद्ध भाजप ५९ आणि सीकरमध्ये काँग्रेस १७९ विरुद्ध भाजप ८७ असे चित्र राहिले. पश्चिम राजस्थानात बाडमेरमध्ये काँग्रेस १२० विरुद्ध भाजप ६२, जैसलमेरमध्ये काँग्रेस ८९ विरुद्ध भाजप ३६ आणि राजसमंदमध्ये काँग्रेस ९७ विरुद्ध भाजप ५८ अशी आघाडी राहिली.
जिल्हा परिषद निवडणुकीत ३७ पैकी २४ जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचे संख्याबळ भाजपपेक्षा अधिक राहिले. दुसरीकडे अजमेर, ब्यावर, डूंगरपूर, झालावाड, पाली आणि उदयपूर या सहा जिल्ह्यांत भाजपने आघाडी घेतली. पंचायत समितीत अजमेरमध्ये भाजप ८३ विरुद्ध काँग्रेस ८०, बालोतरामध्ये भाजप ६३ विरुद्ध काँग्रेस ५७, सलूंबरमध्ये भाजप ३८ विरुद्ध काँग्रेस ३२ आणि उदयपूरमध्ये भाजप १४६ विरुद्ध काँग्रेस १३७ असे भाजप पुढे राहिले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी या निकालांवर प्रतिक्रिया देताना सरकारची तीन वर्षे पूर्ण होत असताना जनतेने त्यांना हे ‘बक्षीस’ दिल्याचे म्हटले. गैरकारभार हेच भाजपच्या पराभवाचे प्रमुख कारण असून कामे होत नव्हती, भ्रष्टाचार वाढला होता आणि जनतेच्या तक्रारी ऐकणारे कोणी नव्हते, असे गेहलोत म्हणाले. मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची धोरणे, कार्यक्रम आणि तत्त्वे यांचा हा विजय असल्याचे त्यांनी नमूद केले.
Leave a Reply